तीन ते पाच लाख रुपये ‘दरा’ची चर्चा

माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदोन्नती देण्यास स्पष्ट नकार दिलेल्या अभियंत्यांना शाखा अभियंता म्हणून पदोन्नती देण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि प्रशासनाकडून बाजार सुरू आहे. शाखा अभियंत्यांच्या या पदासाठी तीन ते पाच लाख रुपये ‘दर’ ठरल्याचे समजते. नुकत्याच निवृत्त झालेल्या दोन कार्यकारी अभियंत्यांच्या जागी वर्णी लागावी म्हणूनही बोली लावली जात असल्याची चर्चा आहे.

नवी मुंबई पालिकेच्या स्थापनेला जानेवारीत २५ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे तेव्हा पालिकेत रुजू झालेले काही अधिकारी व कर्मचारी निवृत्त होऊ लागले आहेत. यात इतर प्राधिकरणांतून तसेच जिल्हा परिषदेमधून पालिका सेवेत आलेल्यांची संख्य जास्त आहे. ३० जून रोजी तीन अधिकारी निवृत्त झाले.

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश निकम, मुख्यालयाचे कार्यकारी अभियंता रवींद्र भोगावकर आणि मोरबे धरणाचे कार्यकारी अभियंता जसवंत मेस्त्री यांचा समावेश होता. डॉ. निकम यांच्या जागी पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांची नियुक्ती जाहीर केली. त्यामुळे आरोग्य विभागासाठी पूर्णवेळ, सक्षम व जुना अधिकारी मिळाला.

३० जून रोजी निवृत्त झालेल्या दोन अभियंत्यांच्या जागी दुसऱ्या दोन कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठीही पालिकेत घोडेबाजार सुरू झाला आहे.

पालिकेतील ६० कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंता म्हणून लवकरच पदोन्नती दिली जाणार आहे. या अभियंत्याच्या पदोन्नतीचा प्रस्ताव माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात पाठविण्यात आला होता.

केवळ पदोन्नती देऊन उपयोग काय, या अभियंत्यांचे काम समाधानकारक नाही, असे कारण देत मुंढे यांनी हा पदोन्नती प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला होता. तो पुन्हा वर काढण्यात आला असून या पदोन्नतीसाठी तीन ते पाच लाखांपर्यंत बोली लावली जात आहे.

बढतीसाठीच्या या घोडेबाजारात सत्ताधारी, प्रशासन, स्थायी समिती आणि विरोधी पक्षातील काही नगरसेवक सहभागी असल्याची चर्चा आहे.

आता तरी रुग्णालये सुरू होणार का?

नेरुळ व ऐरोली येथील मध्यम सार्वजनिक रुग्णालयांच्या इमारती बांधून गेली तीन वर्षे तयार आहेत पण त्या ठिकाणी पुरेशा वैद्यकीय यंत्रणा नाहीत. त्यामुळे ती पूर्ण क्षमतेने सेवेत आलेली नाहीत. नवे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. परोपकारी यांनी तरी ही दोन रुग्णालये लवकर सुरू करावीत, अशी अपेक्षा सर्वसामान्य रुग्णांना आहे. डॉ. परोपकारी परदेशात वैद्यकीय सेवेसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी राजीनामा देताना नोकरीची धारणा कायम ठेवली होती. नोकरी सोडून दोन वर्षांपेक्षा जास्त काळ गेल्यास ही धारणा संपुष्टात येते. डॉ. परोपकारी या मुदतीत पुन्हा रुजू झाले आहेत.