राज्यातील कोळी समाजाची शिखर संघटना असलेल्या कोळी महासंघाने जिल्ह्य़ातील ३० हजार महिलांसाठी रोजगार निर्मिती केली आहे. पहिल्या पाचशे महिलांना पंजाब-महाराष्ट्र बँकेच्या साहाय्याने प्रत्येकी पन्नास हजाराची यंत्रसामग्री घेण्यास आर्थिक सहकार्य केले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मुद्रासारख्या योजनेतून देण्यात येणारे कर्ज सर्वसाधारणपणे बुडीत जात असल्याने बँकेने संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील यांना वैयक्तिक जामीनदार म्हणून घेतले आहे. पाटील यांनी सार्वजनिक कार्यासाठी वैयक्तिक मालमत्ता तारण म्हणून दिली आहे. येत्या काळात सुमारे दीडशे कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले जाणार आहे.
लोकसंख्येने ठाणे व रायगड जिल्ह्य़ात जास्त प्रमाणात विखुरलेला कोळी समाज राज्याच्या कानाकोपऱ्यात असून त्याची संख्या दीड कोटीच्या घरात आहे. इतकी वर्षे केवळ तालुका व जिल्हा पातळीवर संघटनेची मोठ बांधणाऱ्या कोळी समाजाच्या अनेक संस्था, संघ, मंडळ कार्यरत आहेत मात्र गेली दहा वर्षे सातत्याने राज्यातील सर्व जिल्हय़ांतील कोळी समाजाला एक करण्याचे काम नवी मुंबईत तळवली येथे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या कोळी महासंघाने केले असून आज रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाज एकसंध झाला आहे. त्यासाठी काही कोळी संघटना विर्सजितदेखील करण्यात आल्या असून मनाने समुद्रासारखा अथांग असलेला कोळी समाज गेली अनेक वर्षे सरकारी सोयी सुविधांपासून वंचित राहिला आहे. अशा स्वाभीमानी समाजातील महिलांना रोजगाराचे कायमस्वरूपी अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी कोळी महासंघाने एक विकास आराखडा तयार केला आहे. त्यासाठी राज्यातील तीस जिल्ह्य़ांतील तीस हजार महिलांचे तालुक्यानुसार प्रत्येकी शंभर जणींचे गट तयार केले जात आहेत. बचत गटासारखीच काहीशी योजना असणाऱ्या या शंभर जणींच्या गटाला रोजगारासाठी लागणारी यंत्रसामूग्री उभी करून दिली जाणार आहे. त्यासाठी पंजाब महाराष्ट्र बँकेचे आर्थिक सहकार्य घेण्यात आले असून बँकेच्या अध्यक्षा उषा अनंत सुब्रमण्यम यांनी कोळी महासंघाचे अध्यक्ष पाटील वैयक्तिक जामीनदार राहत असल्याने या कर्जाला तात्काळ अनुमती दिली. सर्वसाधारपणे हे कर्ज बुडीत खात्यात जात असल्याने बँकेने ही खबरदारी घेतली आहे.
१५ दिवसांपूर्वी बँकेने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्हय़ांतील ५०१ महिलांना मुंबईत प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज पंतप्रधान मुद्रा योजनेअंर्तगत वितरित केले आहे. यामुळे महिला सक्षमीकरण व पंतप्रधान मुद्रा कर्ज देण्याचे दोन्ही उद्देश बँकेचे सफल झाले आहेत तर कोळी समाजापुढे एक नवीन आव्हाण येऊन ठेपले आहे. टप्प्याटप्प्याने देण्यात येणाऱ्या या कर्जातील तीस हजार महिलांना केवळ कर्ज देऊन न थांबता कोळी महासंघ प्रत्येक तालुक्यात या महिलांसाठी स्वयंरोजगार केंद्र उघडणार आहे. त्याची सुरुवात पनवेल व अहमदनगर येथून होत आहे. या महिलांना कच्च्या मालापासून ते बाजारपेठे पर्यंत सुविद्या उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे केवळ मासेमारी आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या महिला भविष्यात लघुउद्योजक बनतील.