नवी मुंबई पालिकेचे ‘स्कूल व्हिजन’ केवळ कागदावर
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ७९ मध्ये विद्यार्थ्यांसाठी साधे स्वच्छतागृह नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालिकेचे ‘स्कूल व्हिजन’ उपक्रमाचा प्रवास अंधारात सुरू असल्याचा आरोप शिक्षक आणि पालकांनी केला आहे.
ऐरोली मतदारसंघात गोठिवली, रबाळे येथे शाळांची निर्मिती करण्यात आली. या शाळा खासगी शाळांपेक्षा चांगल्या स्थितीत आहेत; परंतु झोपडपट्टी भागातील शाळा अद्याप तशाच आहेत.
दिघा येथील सुभाषनगरातील हिंदी माध्यमांची शाळा क्रमांक ७९ गेली सहा वर्षे सुरू आहे. यादवनगर, सुभाष नगर, गवतेवाडी, विष्णुनगर, इलठणपाडय़ातील हिंदी भाषिक मुले या शाळेत शिकतात. इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग या शाळेत सुरू आहेत. यंदापासून पाचवीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे.शाळेत ३०० विद्यार्थी आहेत. मात्र येथील शाळांना अद्याप शौचालय नाही. एकमेव शौचालय आहे तेही अत्यंत गलिच्छ अवस्थेत आहे. या शौचालयाला लागूनच नळाला पिण्याचे पाणी येते. तेथून मुले आपल्या बाटल्या भरून घेतात, असे एका शिक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.वर्गातील बाके मोडकळीस आली आहेत. पावसाळ्यात छत गळत असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. वर्गातील विद्युत दिवे बंद आहेत. शालेय साहित्यासाठीचे कपाट नसल्याने सामान अस्ताव्यस्त पडले आहे. शाळेच्या इमारतीवरून उच्च दाबाची विद्युत वाहिनी जाते.
त्यामुळे भविष्यातील संभाव्य अपघाताची टांगती तलवार विद्यार्थ्यांच्या डोक्यावर नेहमी असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.ही शाळा नव्याने उभारण्यासाठी पर्यायी जागा मंजूर करण्यात आली आहे; परंतु भूखंडासाठीची जादा रकमेची मागणी एमआयडीसीने केली आहे. त्यामुळे मंजुरी रखडली आहे, असे नगरसेवक जगदीश गवते यांनी सांगितले.
पालिकेच्या मालमत्ता विभागाने एमआयडीसीकडे भूखंड मागितला आहे; परंतु तो अद्याप उपलब्ध नसल्याने शाळा समाजमंदिरात भरवली जात आहे.
– बाळकृष्ण पाटील, शिक्षणाधिकारी