उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणात जूनअखरेपर्यंत पाणी साठा होता. पाऊस लांबल्याने अधिक पाणी कपात करण्याची स्थिती निर्माण झाली होती. मागील आठवडय़ात धरण क्षेत्रात जोरदार पावसामुळे पाण्याची चिंता दूर झाली आहे. त्यामुळे दोन ऐवजी एक दिवसआड पाणी कपात करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आजवर ३२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे रानसई धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. सोमवापर्यंत ११६ फूट उंच रानसईची पातळी ९४.३ फुटांपर्यंत होती, अशी माहिती एमआयडीसीचे साहाय्यक अभियंता रणजित काळेबाग यांनी दिली. शनिवारी यंदाच्या पावसातील सर्वाधिक म्हणजे १७६ मिलिमीटरची नोंद झाली. २५ ग्रामपंचायती तसेच द्रोणागिरी नोडमधील ओएनजीसी तसेच उरण नगरपालिकेला पाणी पुरवले जाते. मार्चपासून धरणाची पाणी पातळी खालावू लागल्याने दर आठवडय़ाला शुक्रवारी होणाऱ्या पाणीकपातीत वाढ करून मंगळवारीही पाणीकपात सुरू करण्यात आली; परंतु सध्या सुरू असलेल्या पावसाच्या जोरामुळे येत्या काही दिवसांत धरणातून करण्यात येणारा पाणीपुरवठा सुरळीत सुरू होणार असल्याने पाणीकपात रद्द करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे
संकेतही एमआयडीसीकडून देण्यात आले आहेत.
दुसरीकडे उरण पूर्व विभागातील आठ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनाडे धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. पुनाडे धरण क्षेत्रातही पाण्याचे प्रमाण वाढल्याने बुधवारपासून थेट नळाद्वारे पूर्ववत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आठ गाव पाणीपुरवठा कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी दिली.