मोरबे धरणातील जलसाठा जुलैपर्यंत पुरविण्याचे आव्हान; बाष्पीभवनाचाही फटका
नवी मुंबई पालिकेने पाणी कपातीत आणखी तीन टक्क्यांनी वाढवून ती ३३ टक्क्यांवर नेली आहे. मोरबे धरणातील जलसाठा सध्या ४७.६२ दशलक्ष क्युबिक मीटर इतका आहे. हा साठा जुलैपर्यंत पुरेल, असा पाणी विभागाचा अंदाज आहे. एमआयडीसीने पाणीकपातीत वाढ केल्याने शहरी भागांत पाण्याचा कमी पुरवठा करण्यात येत आहे. धरणातील जलसाठय़ातील पाच दशलक्ष लिटर पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत आहे.
एमआयडीसी भागात बारवी धरणातून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा केवळ वीस दशलक्ष लिटर होत असल्याने तेथील रहिवाशांचे पाण्याविना हाल सुरू झाले आहेत. या ठिकाणचे रहिवासी व उद्योजक यांना ४५ दशलक्ष लिटर पाणी एमआयडीसी देत होती, मात्र आता त्यात पन्नास टक्केकपात झाली आहे. त्यामुळे पालिकेला आपल्या या नागरी वसाहतीत टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याने सिडको वसाहतीत करण्यात येणाऱ्या एकूण पाणीपुरवठय़ात तीन टक्याने कपात केली गेली आहे. ही पाणी कपात हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. मोरबे धरणात केवळ ४७.६२ मिलियन क्युबिक मीटर पाणीसाठा असल्याने नवी मुंबई शहरात केवळ एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. यापूर्वी याच शहरात चोवीस तास पाणी पुरवठा केला जात होता. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आल्याने वृक्षसंपदेला नैर्सगिक पाण्याच्या हवाली सोडण्यात आले आहे पण पालिकेने ही उपाययोजना सक्षम पद्धतीने केलेली नाही. त्यामुळे अनेक झाडे व हिरवळ जळून गेली आहे.

मोरबे धरणात जुलैपर्यंत पुरेल इतकी पाणीसाठा आहे पण पालिका जपून पाण्याचा वापर करीत असून एमआयडीसी भागातील रहिवाशांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन दशलक्ष लिटर पाणी कपात करण्यात आली आहे.
-अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई पालिका