नवी मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील महिला मंचाचे (WIPS) ३६ वे राष्ट्रीय संमेलन नवी मुंबईत गुरुवारी उत्साहात पार पडले. Standing Conference of Public Enterprises (स्कोप) यांच्या समन्वयाने आयोजित या दोन दिवसीय संमेलनात देशभरातील विविध सार्वजनिक उपक्रमांतील महिला अधिकारी, उद्योगतज्ज्ञ आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते. सुमारे १६ हजारांहून अधिक आजीवन सदस्यांचे जाळे आणि ८८ सार्वजनिक उपक्रमांचा सहभाग यामुळे या संमेलनाला राष्ट्रीय स्तरावरील व्यापक स्वरूप लाभले.
“HER ERA – Now & Beyond” या संकल्पनेवर आधारित या संमेलनाचा उद्देश महिलांसाठी व्यावसायिक प्रगतीच्या नव्या संधी निर्माण करणे, नेतृत्वातील सहभाग वाढवणे आणि कार्यस्थळावरील समावेशकतेबाबत विधायक संवाद घडवून आणणे हा होता. संमेलनाचे उद्घाटन स्कोपचे महासंचालक अतुल सोबती यांनी केले. महाराष्ट्राच्या संयुक्त कामगार आयुक्त शिरीन लोखंडे यांनी उद्योग क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग ही सकारात्मक बाब असल्याचे नमूद करत निर्णयप्रक्रियेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याची गरज अधोरेखित केली.
या वेळी WIPS स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे, नेतृत्व विकास कार्यक्रमांचे आणि सामाजिक बांधिलकीच्या कामांचे दस्तऐवजीकरण या स्मरणिकेत करण्यात आले आहे. उत्कृष्ट उद्योग पुरस्कार आणि उत्कृष्ट महिला कर्मचारी पुरस्कार प्रदान करून विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला. दीर्घकाळ योगदान देणाऱ्या निवृत्त सदस्यांचाही सन्मान करण्यात आला.
पहिल्या दिवशी ‘HER ERA – Now & Beyond’ या विषयावर पॅनेल चर्चा झाली. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड चे संचालक कमांडर वासुदेव पुराणिक आणि ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड चे संचालक गुंजन कुमार सिन्हा यांनी नेतृत्वातील बदल, विविधता आणि भविष्यातील संधींबाबत मते मांडली. अलका मित्तल, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, ओएनजीसी, यांनी आव्हानात्मक परिस्थितीत करिअर घडवताना आवश्यक असलेल्या नेतृत्व कौशल्यांवर मार्गदर्शन केले. ‘यंग अचिव्हर्स’ सत्रात राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूंनी आपल्या यशप्रवासातून चिकाटी आणि शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले.
दुसऱ्या दिवशी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी ‘प्रगतीसाठी पोषण शक्ती’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘एआय, एमएल आणि तंत्रज्ञानाचे बदलते स्वरूप’ या चर्चासत्रात डिजिटल युगातील कौशल्यवृद्धी आणि नव्या तांत्रिक बदलांना सामोरे जाण्याची आवश्यकता स्पष्ट करण्यात आली. महिला अचिव्हर्स सत्रात विविध क्षेत्रांतील यशस्वी महिलांनी आपले अनुभव कथन केले.
संमेलनात शाश्वततेची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. पर्यावरणपूरक कार्यपद्धती आणि जबाबदार नेतृत्वाचा संकल्प व्यक्त करण्यात आला. विविध राज्यांतील सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमाला रंगत आणली. महिला नेतृत्वाचा विस्तार, सहकार्याची नवी संधी आणि सार्वजनिक क्षेत्रातील महिलांसाठी अधिक सक्षम व समावेशक व्यासपीठ उभारण्याच्या दृष्टीने हे ३६ वे राष्ट्रीय संमेलन महत्त्वपूर्ण ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.

