ठेकेदाराला वार्षिक देखभाल ठेका देण्याचा पालिकेचा निर्णय

नवी मुंबई शहरातील रस्त्यांची डागडुजी, देखभाल ही आता एकाच ठेकेदाराला वार्षिक देखभाल ठेका देऊन करून घेण्यात येणार आहे. यासाठी एकूण ४३ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

याआधी नवी मुंबई शहारतील प्रभाग निहाय रस्ते दुरुस्ती, काँक्रीटीकरण, दुभाजक दुरुस्ती, रंगरंगोटी इत्यादी कामे ही वारंवार त्या कामाची निविदा काढून  करण्यात येत होती. यामुळे पालिकेचा वेळ, आर्थिक जादा खर्चीक होती. त्यामुळे यापुढे आता एकाच ठेकेदाराकडून रस्त्याची वार्षिक देखभाल आणि दुरुस्ती करून घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या प्रस्तावामुळे प्रत्येक कामागणिक वारंवार निविदा न काढता एकदाच केलेल्या करारानुसार ठेकेदाराकडून काम करून घेण्यात येणार आहे. बेलापूर विभागातील रस्ते देखभाल व दुरुस्ती करिता आठ कोटी ५२ लाख २२ हजार , नेरुळसाठी सात कोटी ९१ लाख ३९ हजार, वाशीतील रस्त्यांसाठी आठ कोटी ६९ लाख ५८ हजार आणि तुर्भेसाठी आठ कोटी पाच लाख रुपये, कोपरखैरणेतील रस्त्यांसाठी चार कोटी २५ लाख ९१ हजार रुपये तर ऐरोली प्रभागातील रस्ते देखभाल दुरुस्तीला सहा कोटी ३६ लाख  ६० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

चौकांची रंगरंगोटी

या प्रस्तावांतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण, पदपथ, दुभाजक, गटार, चौक दुरुस्ती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधक, पदपथ फुटपाथ, याशिवाय दुभाजकातील वक्र दगडांची रंगरंगोटी, साइन बोर्ड, स्ट्रीट फर्निचर तसेच अपघातात नुकसान झालेल्या वस्तूंची देखभाल करण्यात येणार आहे.

याआधीही रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती प्रभागनिहाय प्रत्येक कामाची निविदा काढून करण्यात येत होती. आता या प्रस्तावांतर्गत एकाच ठेकेदाराला वार्षिक देखभाल दुरुस्ती काम करण्यात येणार आहे. या प्रस्तावामुळे पालिकेचा खर्च, वेळेची बचत होणार आहे.

-जयवंत सुतार, महापौर