नवी मुंबई – येथील डी वाय पाटील स्टेडियम येथे ‘वेव्हज् २०२५’ अंतर्गत संपन्न झालेल्या जगप्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांच्या ‘वंडरमेट’ या सांगीतिक कार्यक्रमानंतर स्टेडियम परिसरातून ५.५ टन तर, रस्त्यावरील २ टन कचरा पालिकेच्यावतीने संकलित करण्यात आला.
भारतातील आघाडीची आयएमएफएल (IMFL) क्षेत्रातील कंपनी रॅडिको खेतान लिमिटेड यांच्यातर्फे संगीतप्रेमींसाठी एका अनोख्या सांगितिक पर्वणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ए. आर. रहमान यांच्या ‘द वंडरमेंट टूर’ यांचा जागतिक प्रीमियर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी शील पनवेल मार्गावर वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी हजारो संगीत प्रेमी उपस्थित होते.
स्टेडियमवर कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली विविध उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने पूर्वनियोजन आणि कार्यक्रमानंतरचे नियोजन करण्यात आले होते. याच अंतर्गत स्टेडियम बाहेरील रस्ते आणि परिसरातील दोन टन कचरा संकलित करून उचलण्यात आला. तर डॉ डी वाय पाटील स्टेडियमच्या आतील भागात १० टन क्षमतेचे लार्जर कॉम्पॅक्टर वाहन उभे करण्यात आले होते. स्टेडियमधून ५.५ टन कचरा संकलित करण्यात आला. जमा केलेला कचरा प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला.
अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपआयुक्त डॉ. अजय गडदे, उपायुक्त सोमनाथ पोटरे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ अमोल पालवे यांच्या नियंत्रणाखाली रात्री स्वच्छता मोहिम पार पडली. या मोहिमेमध्ये मुख्य स्वच्छता अधिकारी संजीव शेकडे, स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर यांच्यासह चार स्वच्छता निरीक्षक, ३ स्वच्छता पर्यवेक्षक आणि ५४ स्वच्छतामित्रांनी हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला. संकलित करण्यात आलेला कचरा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यासाठी ३ कचरा वाहतूक वाहने होती. कचरा वाहतूक व्यवस्थापक आणि ९ स्वच्छताकर्मींनी हा कचरा वाहून नेला.
फुटबॉल सामन्यानंतर स्टेडियमबाहेर दीड टन कचरा
काही महिन्यांपूर्वी ‘कोल्ड प्ले’ या आंतरराष्ट्रीय संगीत कार्यक्रमाचे आयोजन देखील येथे करण्यात आले होते. त्यावेळी देखील परिसरात झालेला कचरा महापालिकेच्या वतीने जमा करण्यात आला होता. तसेच, रेयाल माद्रिद आणि बार्सिलोना या नामांकित फुटबॉल संघातील एल क्लासिको या फुटबॉल या सामन्यानंतर स्टेडियमबाहेरील दीड टन कचरा पालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने स्वच्छ करण्यात आला होता.