नवी मुंबई : गेली काही दिवस शहरात लसीकरणाला गती मिळाली असून ११ लाख ७ हजार पात्र लाभार्थीपैकी ११ लाखांपेक्षा अधिक जणांना पहिली मात्रा, तर दोन्ही लसमात्रा घेतलेल्यांची संख्या ५.७३ लाखांच्या पुढे गेली आहे. पुढील काही दिवसात नवी मुंबईकरांना पहिल्या मात्रेचे लस कवच पूर्ण होणार आहे.

लस तुटवडय़ाअभावी शहरात लसीकरण मोहीम विस्कळीत झाली होती. पालिकेने एका दिवशी १०४ लस केंद्रावर लस दिल्याने मोठय़ा प्रमाणात शहरात लसीकरण होत आहे, परंतु तरीदेखील लसमात्रांच्या तुटवडा सुरूच आहे. पालिकेला ५ दिवसांनंतर लस मिळत आहे. शहरात पालिकेने मोठय़ा प्रमाणात लसीकरण करण्यासाठी जवळजवळ १२० लसीकरण केंद्रांचे नियोजन केले आहे. शहरात लस घेण्यास पात्र असलेल्या ११ लाख ७ हजार नागरिकांपैकी ९९ टक्क्य़ांपेक्षा जास्त नागरिकांना पहिल्या लसमात्रेचे सुरक्षा कवच प्राप्त झाले असून ५ लाख ७३ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.

तिसऱ्या लाटेपूर्वी किमान एक मात्रा देण्याचे पालिकेचे नियोजन आहे. पुढील एक-दोन दिवसांत हे लक्ष्य पूर्ण होणार असा विश्वास पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे.

लसीकरण

११,०७,०००           लसपात्र नागरीक

११,०५,२९६ (९९.५४ %) पहिली मात्रा

५,७३,७९९ (५१.८४ %    )दोन्ही मात्रा

१६,७९,०९५           एकूण लसमात्रा