एक मात्रा घेतलेल्यांची नोंद ६० टक्के

नवी मुंबई</strong> : करोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आरोग्यसेवकांनंतर प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र अद्याप त्यांचेही लसीकरण पूर्ण झालेले नाही. नवी मुंबईत दोन्ही मात्रा घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही ५२ टक्केच आहे. तर एक मात्रा घेतलेल्यांची संख्या ६० टक्केपर्यंत गेली आहे.

करोना प्रादुर्भावाचा सर्वाधिक धोका हा ज्येष्ठ नागरिक व इतर आजार असलेल्या रुग्णांना अधिक असल्याचे आतापर्यंतच्या प्रादुर्भावावरून स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईत आतापर्यंत १९२९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १०७६ मृत्यू हे ज्येष्ठ नागरिकांचे आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

त्यानुसार करोना लसीकरण सुरू झाल्यानंतर प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांना लस देणे सुरू करण्यात आले होते.

नवी मुंबई एकूण लसीकरणपात्र नागरिकांची संख्या १० लाख ८० हजार असून त्यात दीड लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यापैकी ९१ हजार ३७३ जणांना पहिली मात्रा तर ७९ हजार ४१६ जणांना दोन्ही लसमात्रा आतापर्यंत मिळालेल्या आहेत. म्हणजे पहिली मात्रा ही ६० टक्के तर दोन्ही मात्रा घेतलेल्यांची टक्केवारीही ५२ टक्के आहे.

ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू

* ६१ ते ७० वयोगट : ५७०

* ७१ ते ८० वयोगट : ३७४

* ८१ ते ९० वयोगट : १३९

* ९१ ते १०० वयोगट : १५

१.५० लाख        ज्येष्ठ नागरिक संख्या

९१३७३    पहिली मात्रा ७९४१६ दोन्ही मात्रा