scorecardresearch

५२ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे एकाला जीवदान ; नवीन वर्षांतील पहिले अवयवदान; मोहिमेत अधिकाधिक दात्यांचा सहभाग

मोहीम सावरण्यास सुरुवात २०२० मध्ये २०१९ च्या तुलनेत अवयवदानात सुमारे ६२ टक्क्यांनी घट झाली.

मुंबई: नवी मुंबईतील ५२ वर्षीय महिलेचे मरणोत्तर अवयवदान करण्यास नातेवाईकांनी परवानगी दिल्यामुळे यकृताच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला जीवनदान मिळाले आहे. या वर्षांतील हे पहिले अवयवदान आहे.

अवयवदानाची मोहीम सुरू झाल्यापासून गेल्या दोन दशकांमध्ये सर्वाधिक अवयवदान २०१९ साली मुंबईत झाले. या वर्षी ७९ दात्यांनी मरणोत्तर अवयवदान केले. परंतु करोनाची साथ २०२० साली सुरू झाली आणि सर्व रुग्णालये करोनाच्या उपचारासाठी खुली केल्यामुळे मरणोत्तर अवयवदान आणि प्रत्यारोपणाच्या मोहिमेवर याचा परिणाम झाला.  याही वर्षी पुन्हा गेल्या वर्षांप्रमाणेच परिस्थिती आहे. वर्ष सुरू होण्याआधीच तिसरी लाट सुरू झाल्यामुळे यंदाही अवयवदानाच्या मोहिमेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, तिसरी लाट सुरू असतानाही शहरात एक अवयवदान मंगळवारी झाले. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालायत उपचारासाठी दाखल झालेल्या ५२ वर्षीय महिलेचा मेंदू मृत झाल्याने मृत्यू झाला आहे. या रुग्णाच्या नातेवाईकांनी संमती दर्शविल्यामुळे महिलेचे यकृत दान करण्यात आले. नातेवाईकांनी मूत्रिपड, हृदय आणि फुप्फुसे दान करण्यासही परवानगी दिली होती. परंतु वैद्यकीयदृष्टया हे अवयव योग्य नसल्यामुळे यांचे प्रत्यारोपण करण्यात आले नाही. नियमावलीनुसार यकृत प्रत्यारोपणसाठी पाठविले असल्याची माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने (झेडटीसीसी) दिली आहे.

मोहीम सावरण्यास सुरुवात २०२० मध्ये २०१९ च्या तुलनेत अवयवदानात सुमारे ६२ टक्क्यांनी घट झाली. करोनाच्या पहिल्या लाटेतून सावरण्यास डिसेंबर उजाडला, तोवर २०२१ मध्ये दोन महिन्यातच पुन्हा दुसरी लाट आली. पहिल्या लाटेच्या दुसरी लाट अधिक तीव्र होती. मात्र तरीही ही लाट ओसरल्यावर अवयवदानाच्या मोहिमेने पुन्हा गती घेतली. त्यामुळे २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये अवयवदानाचे प्रमाण काही अंशी वाढले.

प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये वाढ

रुग्णालये अन्य आजारांसाठी खुली झाल्यामुळे गेल्यावर्षी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांची संख्याही वाढली आहे.  २०२० मध्ये ३० जणांवर अवयवांचे प्रत्यारोपण झाले होते, तर २०२१ मध्ये हे प्रमाण ३३ वर गेले आहे. २०२० मध्ये ९० अवयवांचे प्रत्यारोपण झाले होते, तर २०२१ मध्ये हे प्रमाण १०९ वर गेले आहे. यामध्ये दोन रुग्णांवर दोन्ही हातांचे तर एका रुग्णावर एका हाताचे प्रत्यारोपण झाले आहे.  तसेच २०२०च्या तुलनेत गेल्यावर्षी हृदयप्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांची संख्याही वाढून ११ वरून २० वर गेली आहे. २०१९ मध्ये २१ जणांवरी हृदयप्रत्यारोपण केले होते.

गेल्या वर्षी करोनाची दुसरी लाट असूनही वेळोवेळी रुग्णालये, समन्वयक, समुपदेशक यांच्या बैठका घेऊन त्यांचे प्रोत्साहन वाढविले. त्यामुळेच या काळातही ३३ रुग्णांचे अवयवदान होऊ शकले आहे. अवयवदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी पालिका, सरकारी रुग्णालयांनीही पुढाकार घ्यायला हवा. यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत. परंतु गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या साथीमुळे या रुग्णालयांवरील कामाचा ताण वाढल्यामुळे ही प्रक्रिया थांबलेली आहे. – डॉ. एस. के. माथूर, अध्यक्ष झेडटीसीसी

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 52 year old woman s organ donation saves one s life zws

ताज्या बातम्या