छायाचित्र नसलेले ५७ हजार मतदार वगळले

अनेकदा संधी देऊनही छायाचित्र न दिल्याने १ लाख ६२ हजार ७८३ छायाचित्र नसलेल्या मतदारांपैकी ५७ हजार मतदारांची नावे निवडणूक आयोगाने वगळली आहेत.

५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

नवी मुंबई : अनेकदा संधी देऊनही छायाचित्र न दिल्याने १ लाख ६२ हजार ७८३ छायाचित्र नसलेल्या मतदारांपैकी ५७ हजार मतदारांची नावे निवडणूक आयोगाने वगळली आहेत. आता पुन्हा मतदार पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असून त्याची अंतिम यादी ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यातही अनेक छायाचित्र नसलेल्या मतदारांना आपला मतदानाचा हक्क गमवावा लागणार आहे. त्यामुळे मतदारांनी आपली नावे मतदारयादीत आहेत की नाहीत याची खात्री करून घेण्याची आवश्यकता आहे.

नवी मुंबई शहरात बेलापूर व ऐरोली हे दोन मतदार संघ असून ९ लाख २५ हजार ३७३ मतदार होते. यात बेलापूर मतदारसंघात ४,२१,६३३ तर ऐरोली मतदार संघात ५,०,३७,७४० इतके मतदार होते. त्यापैकी ऐरोली मतदारसंघात ९८,२७६ तर बेलापूर मतदारसंघात ६४,५०७ मतदारांची छायाचित्रे नव्हती. गेल्या काही महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाने या छायाचित्र नसलेल्या मतदारांना वगळण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापूर्वी मतदारांना छायाचित्र सादर करण्याची अनेकदा संधी दिली. राजकीय पक्षांनाही ही यादी पाठविण्यात आली होती. त्यांनी या मतदरांशी संपर्क करीत छायाचित्र देण्याची विनंती केली होती. मात्र तरीही याला हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नवी मुंबईतील् सुमारे ५७ हजार छायाचित्र नसलेले मतदार वगळण्यात आले आहेत. यात बेलापूर मतदारसंघातील ३७,००० तर  ऐरोली मतदारसंघातील २०,०१५ मतदारांचा समावेश आहे. ५ मार्चपूर्वी छायाचित्र नसलेल्या मतदारांनी आपले छायाचित्र दिले नाही तर उर्वरित छायाचित्र नसलेली नावेही वगळण्यात येणार असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आता नवी मुंबई महापालिकेची करोनामुळे गेले दीड वर्ष होऊ न शकलेली निवडणूक होण्याची शक्यता असून पुन्हा मतदार पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. अंतिम मतयादी ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या प्रभागातील नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्याबरोबर छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळू नयेत यासाठी राजकीय पदाधिकारी कामाला लागले आहेत.

 परंतु मतदारांना आपली नावे मतदार यादीत आहेत का? याची खातरजमा करण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान केंद्रे असतात त्या ठिकाणी मतदार याद्यी उपलब्ध करून देण्याची मागणी राजकीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ज्या मतदारांचे छायाचित्र नावासमवेत नाही त्यांची नावे वगळण्यात येत आहेत. लवकरात लवकर ही छायाचित्रे आणून दिली नाहीत तर छायाचित्र नसलेले उर्वरित मतदारही मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.

-ज्ञानेश्वर खुटवड, मतदार नोंदणी अधिकारी, बेलापूर १५१

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 57000 voters photographs excluded ysh

Next Story
मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
ताज्या बातम्या