scorecardresearch

नवी मुंबईत उद्दिष्टापेक्षा अधिक ६१५ कोटीची विक्रमी मालमत्ताकर वसूली

पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मानले सुजाण नागरिकांचे आभार… आणखी एक दिवस बाकी

Navi Mumbai
नवी मुंबई-महानगरपालिका (संग्रहित छायाचित्र)

संतोष जाधव

नवी मुंबई-महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ताकर वसूलीकडे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष देण्यात आले होते. या अनुषंगाने मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले यांनी नियोजनबध्द काम करीत करवसूलीच्या दृष्टीने उचललेल्या सुयोग्य निर्णयांमुळे विद्यमान आर्थिक वर्ष संपण्याच्या १ दिवस आधीच म्हणजेच ३० मार्च  सायंकाळपर्यंत अर्थसंकल्प २०२२-२३ मध्ये ठेवलेले ५७५ कोटी रक्कमेचे उद्दिष्ट पार करीत  ६१५ कोटी मालमत्ता कर वसूल करण्याचे विक्रमी लक्ष गाठले आहे. शुक्रवारी अखेरच्या दिवशी यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ताने नुकतेच  यावर्षी पालिकेची मालमत्ता कर वसुली ६०० कोटी पार करणार असे वृत्त दिले होते.पालिका इतिहासात पहिल्यांदाच मालमत्ताकराची ६०० कोटीपेक्षा अधिक विक्रमी वसूली झालेली असून हा निधी महानगरपालिकेच्या वतीने नागरी सुविधा पूर्ततेसाठी खर्च केला जात असल्याने नागरिकांच्या सहकार्याबद्दल आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईकर नागरिकांचे आभार मानले आहेत.

या आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस ३१ मार्च शुक्रवारीअसल्याने आज रामनवमीची सार्वजनिक सुट्टी असूनही नागरिकांना करभरणा करणे सोयीचे जावे म्हणून महानगरपालिकेची सर्व कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती.यावर्षी नागरिकांनी आपला मालमत्ताकर विहित वेळेत भरावा यादृष्टीने विविध माध्यमांतून आवाहन करण्यात आले होते. कोरोना कालावधीत नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते याचा साकल्याने विचार करून पुन्हा एकवार थकित मालमत्ताकराच्या दंडात्मक रक्कमेवर ७५ टक्के सूट देणारी अभय योजना १५ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत जाहीर करण्यात आली होती व त्यानंतरही १६ मार्च ते ३१ मार्चपर्यंत ५० टक्के सूट देण्यात आलेली होती. नागरिकांनी अभय योजनेचाही मोठ्या प्रमाणावर लाभ घेतल्याचे चित्र पहायला मिळाले. एकूण १२०६८ व्यक्ती, संस्थांनी अभय योजनेचा लाभ घेत १०९.३७ कोटी इतकी रक्कम जमा केली.

अभय योजनेची आवाहनपत्रे संबंधितांना महानगरपालिकेमार्फत देण्यात आली होती. तसेच सोशल माध्यमांव्दारे, वर्तमानपत्रांव्दारे, हस्तपत्रके वितरणाव्दारे तसेच ठिकठिकाणी प्रदर्शित केलेल्या होर्डींगव्दारे नागरिकांना आवाहन करण्यात आले. रिक्षा फिरवून ध्वनीक्षेपकाव्दारेही नागरिकांना गल्लोगल्ली आवाहन करण्यात आले. अशा विविध माध्यमांचा प्रभावी वापर करीत नागरिकांपर्यंत पोहचल्याने नागरिकांचा उत्साही प्रतिसाद लाभला.

 अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले यांनी आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार विभागनिहाय नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना वसूलीचे लक्ष्य आखून दिले व त्यांच्या कामगिरीचा सातत्यपूर्ण आढावा घेऊन त्यांच्या कामावर बारीक लक्ष ठेवले. त्यांना वसूली कामात येणा-या अडचणी प्राधान्याने दूर करण्यावर विशेष भर दिला. मालमत्ताकराविषयी नागरिकांच्या असलेल्या हरकती, सूचनांक़डे लक्ष देत वेळोवेळी सुनावणी घेऊन नागरिकांच्या अडचणी दूर करण्याकडे व यातून जास्तीत जास्त वसूली होईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. याचा परिपाक म्हणजे आत्तापर्यंतची सर्वाधिक मालमत्ताकर वसूली झालेली आहे. या आर्थिक वर्षात नागरिकांना मालमत्ताकर भरण्याचे आवाहन करण्यासोबत, त्यांच्या अडचणी जाणून घेत, त्यांची सोडवणूक करण्याप्रमाणेच मालमत्ताकर थकबाकीदारांना नियमानुसार ७ दिवसांच्या व त्यानंतर ४८ तासांच्या नोटीसा बजाविण्यात आलेल्या होत्या. १० लक्ष रक्कमेहून अधिक थकबाकी असणा-या १५० हून अधिक थकबाकीदारांच्या मालमत्तांची अटकावणी करण्यात आलेली होती.

त्यापैकी १०० हून अधिक थकबाकीदारांनी लगेचच आपल्या थकबाकीचा भरणाही केला.या सोबतीनेच प्रामुख्याने एमआयडीसी क्षेत्रातील तसेच निवासी क्षेत्रातील मालमत्ताकर न लागलेल्या मालमत्तांच्या प्रलंबित निर्धारणा प्राधान्याने पूर्ण करून त्यांना मालमत्ताकर लागू करून कराच्या जाळ्यात आणण्याचे महत्वाचे काम करण्यात आले.करवसूलीचे अधिकारी, कर्मचारी यांना उद्दिष्ट आखून देतानाही मोठ्या रक्कमेच्या मालमत्ताकर धारकांच्या वसूलीकडे विशेष लक्ष देण्यात आले. तशा प्रकारची रक्कमेच्या उतरत्या क्रमाने सूची तयार करून नियोजनबध्द रितीने करवसूलीचे काम करण्यात आले. यामध्ये आवाहन करण्यासोबतच त्यांच्या घर, कार्यालयासमोर ढोलताशा वाजवून काहीशी कठोर भूमिकाही घेण्यात आली.महानगरपालिकेमार्फत नागरिकांसाठी पुरविण्यात येणा-या नागरी सुविधा या नागरिकांकडून करापोटी येणा-या रक्कमेतूनच पुरविल्या जात असल्याने मालमत्ताकर हा एकप्रकारे नागरिकांनी शहर विकासासाठी लावलेला हातभार आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक बाबतीत आघाडीवर असणा-या सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी करभरणा करण्यातही आपले कर्तव्य बजावले असल्याचे समाधान व्यक्त करीत व त्याबद्दल नागरिकांचे आभार मानत महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले आणि त्यांच्या करविभागातील सहका-यांची चांगल्या कामगिरीबद्दल प्रशंसा केली

मालमत्ता कराची विक्रमी वसुली….

सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे व आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या नियोजनबद्ध वसुलीमुळे प्रथमच मालमत्ता कर वसुली ६१५ कोटीच्या पार झाली आहे. अजूनही एक दिवस मालमत्ता कर वसुलीसाठी बाकी असून ६१५ कोटी मध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे सुजाता ढोले अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई महापालिका

अशी झाली मालमत्ता कर वसुली

सन २०१९-२० – ५५८ कोटी

सन २०२०-२१- ५३४ कोटी

सन २०२१-२२- ५२६ कोटी

सन २०२२-२३-६१५ कोटी

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 23:50 IST

संबंधित बातम्या