नवी मुंबई : शहराचा विकास आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वी सिडकोने विक्रीसाठी काढलेल्या १६ भूखंडासाठी सिडकोच्या तिजोरीत ६७८ कोटी रुपये ई लिलाव पद्धतीने जमा झाल्याचे समजते. नेरुळ सेक्टर ५४ मधील २५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाला सर्वाधिक ३८० कोटी रुपयांची बोली लागली आहे.

सिडकोने सुमारे ३३ हजार चौरस मीटरचे भूखंड मागील महिन्यात विक्रीसाठी काढले होते. महागाई दिवसेंदिवस वाढत असताना सिडकोच्या मोक्याच्या भूखंडांना चांगली मागणी असून विकासकांच्या उडय़ा पडत असल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबईतील भूखंड व घरांना मध्य तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील मालमत्तापेक्षा जास्त मागणी अलीकडे येत आहे. नियोजित विमानतळ, सागरी सेतू मार्ग, नेरुळ उरण रेल्वे मार्ग, मेट्रो अशा लवकरच सुरू होणाऱ्या वाहतूक प्रकल्पांमुळे सिडकोच्या भूखंडांची मागणी वाढली आहे.

नवी मुंबई पालिकेने ९ ऑगस्ट रोजी विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. सिडकोने यातील काही आरक्षित भूखंड विक्री केले आहेत. मात्र विकास आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वी विक्री करण्यात आलेले भूखंड विक्री करणे हा सिडकोचा हक्क असल्याचे सिडको अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

एका भूखंडालाच ३८० कोटींची बोली

मागील आठवडय़ात विविध नोडमधील १६ भूखंड विक्रीसाठी काढण्यात आले असून यात नेरुळ नोडमधील पाच भूखंडांचा समावेश आहे. नेरुळ सेक्टर ५४ जवळचा २५ हजार चौरस मीटर भूखंडाला जास्त मागणी होती. या भूखंडाच्या जवळच जलवाहतुकीची जेट्टी, शाळा, पामबीच मार्ग आणि अनिवासी संकुल आहे. त्यामुळे या भूखंडाला ३८० कोटी रुपयांची बोली आली आहे. सिडकोची तिजोरी सध्या खाली झाली आहे. या तिजोरीत या ई बोलीमुळे ६७८ कोटी रुपये जमा झाले असून सिडकोची आर्थिक स्थिती भूखंड विक्रीतून सुधारलेली आहे.