बॅंकेत रोख रक्कम जमा करण्यासाठी जात असाल तर जरा खबरदारीने व्यवहार करा. जोपर्यंत बॅंकेच्या कॅश काऊंटरवर रोख रक्कम आणि पैसे भरण्याची स्लीप जमा करत नाही, तोपर्यंत संबंधित रकमेची जबाबदारी संबंधित खातेधारकाची असते. हे सुद्धा ध्यानात घ्या. नवीन पनवेल वसाहतीमध्ये २७ वर्षीय महिला खातेधारकाला असाच भामट्यांकडून गंडा घालण्यात आला आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : पनवेल परिसरात बिबट्याच्या कातडीची तस्करी; आरोपीस अटक
संबंधित महिला शुक्रवारी सकाळी पावणेबारा ते सव्वा बारा वाजण्याच्या दरम्यान आय.सी.आय.सी.आय बॅंकेत ६८ हजार रुपयांची रोख रक्कम जमा करण्यासाठी गेल्या होत्या. त्या महिला संबंधित रोख रकमेचा तपशील भरण्यासाठी टेबलवर स्लिपमध्ये लिहीत असताना त्यांच्या नकळत संबंधित रक्कम भामट्याने उचलून तेथून पसार झाला. याबाबत संबंधित पीडीत महिलेने खांदेश्वर पोलीस ठाण्यात ६८ हजार रुपये बॅंकेतून चोरी झाल्याची तक्रार नोंदविली आहे. पोलीस फरार भामट्याचा शोध घेत आहेत.