ज्येष्ठांनाही लस चिंता!

आतापर्यंत फक्त ९,१४७ जणांनाच दुसरी मात्रा; आजही लसीकरण बंद?

Corona-Vaccination-1
(संग्रहित छायाचित्र)

आतापर्यंत फक्त ९,१४७ जणांनाच दुसरी मात्रा; आजही लसीकरण बंद?

नवी मुंबई : जुलै अखेपर्यंत दीड लाख ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे नवी मुंबई महापालिकेचे नियोजन लस उपलब्ध नसल्याने फसणार आहे. आतापर्यंत फक्त ७८०८० ज्येष्ठ नागरिकांना लस दिली असून यात दुसरी मात्रा फक्त ९१४७ जणांनाच दिली आहे. त्यात गेली चार दिवस लसपुरवठा न झाल्याने पालिकेची लसीकरण केंद्रे बंद आहेत. मोजक्याच केंद्रांवर गुरुवारी फक्त कोवॅक्सिनची दुसरी मात्रा देण्यात आली.

शहरात करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असून नवी मुंबई महापालिकेने वेगवान लसीकरणासाठी शहरात १०४ लसीकरण केंद्रांचे नियोजन केले आहे. मात्र त्यातील ७४ केंद्रे प्रत्यक्षात कार्यरत असताना दुसरीकडे शासनाकडून लसपुरवठा होत नाही. त्यामुळे लस कुप्यांचा तुटवडा कायम असल्याने ज्येष्ठ नागरिकांना दुसरी मात्रा द्यायची कशी, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. शुक्रवारीही शहरात पहिल्या मात्रेचे लसीकरण होणार नसल्याची माहिती लसीकरण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शहरात लोकसंख्येच्या तुलनेत १० टक्के ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. हे प्रमाण गृहीत धरले तर १.५० लाख ज्येष्ठ नागरिक शहरात राहात असल्याचा अंदाज गृहीत धरून पालिका प्रशासनाने लसीकरणचे नियोजन केले होते. ३१ जुलैअखेर एक तरी मात्रा देण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु सततचा लसतुटवडा असल्याने पालिकेचे हे लक्ष्य कसे पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील लोकसंख्येच्या १० टक्के म्हणजेच १५ लाख लोकसंख्येनुसार १.५० ज्येष्ठ नागरिकांना जुलैअखेर एक तरी मात्रा देण्याचे पालिकेचे लक्ष आहे. त्यानुसार ज्येष्ठांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र लसच उपलब्ध होत नसल्याने पेच निर्माण झाला आहे.

– डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख, महापालिका

ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण

* पहिली मात्रा :     ६८,९३३

* दुसरी मात्र :       ९१४७

एकूण लसीकरण :    ७८,०८०

मिळालेली लस

* १८ जून :  ११,८५०

* २१ जून :  १२०००

* २५ जून :  १५००

* २७ जून :   १०,८८०

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 78080 senior citizens vaccinated in navi mumbai zws