नवी मुंबई महापालिकेत ८६५ पदांना मंजुरी

नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईची लोकसंख्या इतर उपनगराच्या तुलनेत झपाटय़ाने वाढत असल्याने नागरी कामांचा ताणही तेवढय़ाच पटींनी वाढला आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेचे मनुष्यबळ वाढवण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. ८६५ पदांना मंजुरी देताना एक हजार ४३४ पदांच्या आकृतिबंधाला मात्र कात्री लावण्यात आली आहे. यासंदर्भातील नियमावली बनविण्याचे काम सुरू आहे. या नोकरभरतीनंतर पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या चार हजार ११८वर जाणार असली, तरी शेजारच्या मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकांच्या तुलनेत ही संख्या कमीच आहे. काही शिपाई, लिपिक आणि डेटा एंट्री ऑपरेटर अशा पदांचे आऊटसोर्सिग करण्याचा सल्ला शासनाने दिला आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

ग्रामपंचायतीमधून थेट पालिकेत रूपांतर झालेल्या नवी मुंबई पालिकेच्या कामाचा डोलारा दिवसेंदिवस विस्तारत आहे. जेमतेम बारा ते चौदा लाख लोकसंख्येच्या नवी मुंबईचे क्षेत्रफळ मात्र जास्त आहे. पुढील वर्षी पालिकेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. पालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या कमी असून राज्यात आस्थापनेवर कमी खर्च करणारी पालिका म्हणून नवी मुंबई पालिकेचा लौकिक आहे. सद्य:स्थितीत विविध १८ विभागांत दोन हजार ३७५ कायमस्वरूपी कर्मचारी व अधिकारी पालिकेत कार्यरत आहेत. साफसफाई अथवा इतर अत्यावश्यक सेवेत सहा हजार ६३ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. त्यांना समान काम समान वेतनाचा लाभ दिला जात आहे. पाच वर्षांपूर्वी पालिकेने कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नोकरभरतीचा आकृतिबंध शासनाकडे सादर केला आहे. त्यात सद्य:स्थितीतील कर्मचारी अधिकाऱ्यांपेक्षा तीन हजार ४३४ पदे मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे माजी नगरविकास सचिव श्रीकांत सिंह यांनी एक वर्षांपूर्वी रुग्णालय व अग्निशमन या अत्यावश्यक सेवांसाठी ९०३ कर्मचाऱ्यांच्या पदांना मान्यता दिली होती.

त्यानंतर आता नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर यांनी ८६५ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पदांना मंजुरी दिली, मात्र त्याच वेळी ५६९ पदांना कात्री लावण्यात आली. त्याऐवजी आऊटसोर्सिग करून काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या पदांच्या मंजुरीसाठी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे व उपायुक्त सुहास शिंदे यांनी आवश्यक पदांचे सादरीकरण नगरविकास विभागाला केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोहर या मंजुरीवर उमटल्यानंतर नवीन वर्षांत ही नोकरभरती केली जाणार आहे. त्यासाठी कडक नियमावली तयार केली जात असून पालिकेच्या सेवेत या नोकरभरतीनंतर कर्मचारी संख्या चार हजाराच्या वर होणार आहे.

नोकरभरतीचा आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यातील काही पदांना मंजुरी देण्यात आली असून काही पदांची मंजुरी शिल्लक आहे. ती लवकरच मिळवण्यात येणार आहे. या पदांच्या मंजुरीमुळे पालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या चार हजारांपर्यंत जाणार आहे.

– सुहास शिंदे, उपायुक्त (प्रशासन) नवी मुंबई पालिका