माफी नाही तर सवलत मिळावी म्हणून मालमत्ताधारक सरसावले

पनवेल : राजकीय आश्वासने हवेत विरल्याने पनवेलमधील सिडको वसाहतींतील मालमत्ताधारकांनी करभरणा सुरू केला आहे. करात माफी मिळत नाही तर पालिकेची सवलत तरी मिळावी म्हणून करभरणा करण्यात येत असून ३१ जुलै या एकाच दिवशी ९ कोटी २८ लाख ६२ हजार रुपयांचा भरणा केला आहे. हा आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक करभरणा आहे.

पनवेल पालिका प्रशासनाने विकास हवा असेल तर कर भरावाच लागेल अशी ठोस भूमिका घेत चार वर्षांच्या थकीत करासह सिडको वसाहतींना मालमत्ता कर लागू केला. याला तीव्र विरोध होत होता. गेली अनेक दिवस विरोधक कर भरू नका असे आवाहन करीत होते, मात्र यावर कोणताही ठोस पर्याय निघत नव्हता. त्यात पालिका प्रशासनाने कर भरावाच लागेल अशी भूमिका घेत ऑनलाइन भरणा केल्यास १७ टक्के सवलत जाहीर केली होती. याची मुदत ३१ जुलैपर्यंत होती.

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी गेल्या १४ दिवसांत मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत २५ कोटी रुपये करदात्यांनी जमा केले आहेत तर आर्थिक वर्षांत आतापर्यंत ४१ कोटी ५६ लाख रुपये जमा झाले आहेत. ३१ जुलैच्या सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत ६ कोटी ४० लाख रुपयांचा करभरणा नागरिकांनी केला. मात्र त्याच रात्री १२ वाजेपर्यंत ९ कोटी रुपये नागरिकांनी भरून सवलत मिळविली आहे.

महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांना यापूर्वीही कर भरण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांकडे महाविकास आघाडीचे नेते व भाजपच्या नगरसेविकांकडून कर भरू नका, याबाबत जनजागृतीसाठी मोर्चे, चर्चासत्र राबविण्यात आली. मात्र राज्यातील मंत्र्यांनीच सामान्यांच्या मागणीकडे कानाडोळा केल्याने अखेर नागरिकांनी पालिकेचा चार वर्षांचा थकीत कर भरण्याचा मार्ग निवडल्याचे दिसत आहे.

३० सप्टेंबपर्यंत १० टक्के सूट

हा आजपर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक करभरणा ठरल्याने पनवेल पालिकेच्या प्रशासनाने पाहिलेले करापोटी ७०० कोटी रुपये कर जमा होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याचा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने करसवलत वाढवत ३० सप्टेंबपर्यंत जाहीर केली आहे. यामध्ये सवलतीनुसार आता १० टक्के सूट आणि ऑनलाइन कर भरल्यास वाढीव २ टक्के सूट देण्यात आली आहे.