एका गरोदर महिलेचा विनय भंग केल्या प्रकरणी पोलीस कर्मचार्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी आणि चारचाकीच्या एका छोट्या अपघातातून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि हवालदाराच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिनेश महाजन या व्यक्ती विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून महाजन हे पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत आहेत. सध्या मुख्यालयात ते कर्तव्य बजावत आहेत. खारघर येथे राहणारी पीडिता हि गरोदर असून नियमित तपासणीसाठी पती सोबत त्या रुग्णालयात जात असताना अकराच्या सुमारास बेलपाडा  मेट्रो स्थानकानजीक त्यांच्या दुचाकीला एका जीपने धडक दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा अपघात फार मोठा नव्हता मात्र गरोदर पत्नीला काही झाले असते तर या विचाराने चिडून पिडीत महिलेच्या पतीने गाडी चालक दिनेश महाजन याला जाब विचारला. मात्र महाजन यांनी त्यांच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी बाजूला झाल्याने त्यांच्या पत्नीच्या तोंडावर मार लागला. यातून वाद झाले. आरोपीने स्वतः पोलीस असल्याचे सांगत अरेरावी केली असा दावा फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी दिनेश याला नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे. अशी माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been filed against a police officer for violating the modesty of a pregnant woman amy
First published on: 01-02-2023 at 22:40 IST