नवी मुंबई : स्वतःच्या ११ वर्षीय मुलीस बेदम मारहाण करणाऱ्या आई-वडिलांविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीची अवस्था पाहता तिला पोलिसांनी बाल आश्रमात ठेवले आहे. एका सामाजिक संस्थेने पीडित मुलीची तिच्या आई वडिलांपासून सुटका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईतील सीबीडी स्थित टाटानगर येथे राहणाऱ्या एका ११ वर्षीय मुलीस तिचेच आई-वडील बेदम मारहाण करतात आणि पायला चटके देण्यात आले आहेत, अशी माहिती चाइल्ड लाइन या सामाजिक संस्थेसाठी काम करणाऱ्या अर्चना दहातुंडे यांना मिळाली होती. माहिती मिळताच सहकारी योगेश कांबळे यांच्या समवेत अर्चना या टाटानगर परिसरात आल्या. घटना ज्यांच्या घरी घडली त्यांचा शोध घेतला. घरात जाऊन पाहणी केली असता ज्या मुलीला मारहाण करण्यात आली ती मुलगी समोर आली. ती खूप भेदरलेल्या अवस्थेत होती. आलेले लोक आपल्या मदतीसाठी आले हे कळताच ती अर्चना यांना बिलगली. त्यावेळी पीडित मुलीच्या अंगावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या, तर पायावर चटके दिलेले दिसून येत होते.

हेही वाचा – नवी मुंबई महापालिकेची थकबाकीदारांसमोर ढोल वाजवून कर वसुली; सानपाडा येथील फुल स्टॉप मॉलमधील ८ युनीट सील

हेही वाचा – महालक्ष्मी सरसरमध्ये खापरावरील पुरणपोळीचा थाट न्यारा, पुरणपोळीच्या विक्रीतून चांगली कमाई

मारहाण प्रमोद यांनी केली असून, पायाला चटके आई नीलम यांनी दिले असल्याची माहिती पीडित मुलीने दिली. विशेष म्हणजे, ही घटना होऊन सात दिवस झाले असताना तिला कोणी डॉक्टरकडेही नेले नव्हते. मारहाण का करण्यात आली, याबाबत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र प्रमोद आणि नीलम यांच्याविरोधात मुलांची काळजी व संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पीडित मुलीस बाल आश्रमात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been filed against the parents who beat their little daughter in navi mumbai ssb
First published on: 21-03-2023 at 16:00 IST