नवी मुंबई: जुगार खेळतात असा आरोप करून गुडलकच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या व्यक्ती विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली तरी काहीही होणार नाही अशी धमकीही त्याने दिली होती. एकनाथ अडसूळ असे यातील आरोपीचे नाव आहे. यातील फिर्यादी आणि त्यांचे काही मित्र जुगार खेळतात असा आरोप आरोपीने केला. याबाबत बातमी छापण्याची धमकी त्याने फिर्यादी यांना दिली. बदनामी होईल या भीतीने बातमी न छापण्याची विनंती केल्यावर आरोपीने ५० हजार खंडणी आणि महिना ५ हजार रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिली. हेही वाचा. ठाणे, नवी मुंबईत नव्या पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला वेग; जागेसाठी हालचाली सुरू तडजोड केल्यावर ५० हजार खंडणी ऐवजी २० हजार खंडणी देण्याची तयारी आरोपीने दर्शवली. त्यातील दहा हजार रुपये फिर्यादी यांनी ऑन लाईन आरोपीला पाठवले. मात्र हे वारंवार होणार असे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी या बाबत वाशी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दोघांचे फोन वरील संभाषण आणि ऑन लाईन दिलेले पैसे तसेच अन्य काही घटना पाहता पोलिसांनी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीची शहानिशा करीत आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला. गुडलक काय आहे? गुन्हेगारी क्षेत्रात अनेक सांकेतिक शब्दांचा वापर केला जातो. त्यातील अनेक शब्दांचे अर्थ आता सर्वसामान्यांनाही कळत आहेत. पेटी म्हणजे लाख रुपये तर खोका म्हणजे एक कोटी हे सर्वांना ज्ञात झाले आहे. तसेच खंडणी मागताना गुडलक या शब्दाचा वापर केला जात असल्याचे अनेक गुन्ह्यात निदर्शनास आले आहे. या गुन्ह्यात आरोपीने खंडणी मागताना गुडलक या शब्दाचा उपयोग केला आहे. अशी माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली.