पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पनवेल बस आगाराजवळील धोकादायक अवस्थेतील जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी हा फलक पाडण्यात आला. आतापर्यंत महापालिकेच्या चारही प्रभागामध्ये ३३ अनधिकृत जाहिरात फलकांपैकी २१ अनधिकृत फलकांचे पाडकाम पालिकेने केले आहे. 

मुंबईतील घाटकोपर येथील फलक दुर्घटनेनंतर पनवेल महानगरपालिकेने धोकादायक फलकावरील कारवाईविषयी ठोस भूमिका घेतली. मागील आठवड्यातील शनिवारी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी घेतलेल्या विभागवार आढावा बैठकीमध्ये उर्वरित फलकांचा तातडीने सर्वे करण्याची सूचना केली होती. या सर्वेत  अत्यंत धोकादायक फलकाचे पाडकाम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सर्वेक्षणात पनवेलमधील बस आगार आणि हॉटेल दत्त इन जवळील जाहिरत फलक गेले काही दिवस गंजलेल्या अवस्थेत होते. अंदाजे ४० फूट उंच असलेले हे जाहिरात फलक धोकादायक बनले होते. हा परिसर अत्यंत गर्दीचा परिसर आहे. बस आगारातून रोज हजारो नागरिकांची ये-जा असते. परंतु याठिकाणी काही तांत्रिक अडचणींमुळे कारवाई करता येत नव्हती. पालिकेचे अतिक्रमन विरोधी पथकाचे प्रमुख उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक अडचणींवर मात करत अखेर हे जाहिरात फलक नेस्तनाबूत करण्यात आले. यावेळी महापालिकेचे प्रभाग अधिकारी रोशन माळी, क्षेत्रीय अभियंता संकेत कोचे,  तुषार कामतेकर आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A dangerous advertisement board near panvel bus agar was pulled down amy