नवी मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या जयंतीनिमित्त आयोजित सहस्त्र जलकलशाभिषेक रथ यात्रेचे नवी मुंबईत भाजप आमदार गणेश नाईक यांच्यातर्फे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. देशभरातील नद्यांचे आणि तीर्थ क्षेत्राचे पाणी घेऊन एक हजार कलश घेऊन हे रथ रायगडावर जाणार आहे. या पवित्र पाण्याने राज्यभिषेक करत छत्रपतींना वंदन करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक दिन उत्सव सेवा समिती आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवशंभो विचार मंच कोकण प्रांत वतीने हि कलश यात्रा काढण्यात आली होती. मराठी तिथीप्रमाणे येत्या २ जून २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड येथे साजरा होणार आहे. या निमित्त गंगा,यमुना, सरस्वती, कावेरी अशा देशातील प्रमुख नद्यांच्या पवित्र जलाने शिवराज्याभिषेक करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या पवित्र नद्यांच्या जल कलशाची रथयात्रा काढण्यात आली आहे. हेही वाचा. उरण : जेएनपीए बनणार देशातील पहिले स्मार्ट बंदर, बंदराचे ३५ व्या वर्षात पदार्पण काल शुक्रवार २६ मे रोजी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी या रथयात्रेचा राजभवन येथे शुभारंभ केला. शनिवारी दुपारी ही रथयात्रा वाशी येथे पोहोचली. महाराजांचा जयजयकार यावेळी ढोल ताशांच्या गजरामध्ये करण्यात आला. यावेळी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या सह अनेक भाजप पदाधिकारी आणि शिवप्रेमी तसेच छत्रपती शिवाजी महाराज शिवशंभो विचार मंच कोकण प्रांत सहसंयोजक अभय जगताप, सचिव सुधीर थोरात, शिवराज्याभिषेक दिन उत्सव सेवा समिती सहकार्यवाह पंकज भोसले,उपस्थित होते.