नवी मुंबई : नवी मुंबईतील लोकल प्रवास सुसह्य व्हावा, यासाठी रेल्वेने सुरू केलेली वातानुकूलित (एसी) लोकल अनेकांसाठी दिलासादायक ठरली आहे. मात्र या ‘गारेगार’ प्रवासाची किंमत ऐकून सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. अंगाला घाम लागू न देणारी ही लोकल, तिकीट दरामुळे मात्र कपाळावर घाम फोडत असल्याची भावना मध्यमवर्गीय प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून ते पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत २६ जानेवारी २०२६ पासून पुन्हा एकदा वातानुकूलित ७ लोकलच्या एकूण १४ फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून साध्या लोकलच्या तुलनेत एसी लोकलचे भाडे लक्षणीयरीत्या अधिक आहेत. वाशी ते पनवेल किंवा सीएसएमटीसारख्या महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा थेट फटका बसत आहे. उदाहरणार्थ, वाशी ते पनवेल या अवघ्या २० मिनिटांच्या प्रवासासाठी एसी लोकलचे तिकीट ७० रुपयांच्या घरात जाते. त्याच अंतरासाठी साध्या लोकलने केवळ १५ रुपयांत तर पहिल्या दर्जात ६५ रुपयांत प्रवास शक्य आहे. त्यामुळे एसी लोकलच्या एका फेरीइतक्या रकमेत साध्या लोकलच्या सहा ते सात फेऱ्या होऊ शकतात, असा हिशेब प्रवासी मांडत आहेत.

दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी मासिक पासचा खर्चही जड ठरत आहे. एसी लोकलचा मासिक पास सध्या १२०० ते २४००० रुपयांच्या दरम्यान आहे. या उलट साध्या पासचे दर ३०० ते ४००० रुपये आणि पहिल्या वर्गाचा पास ११०० ते १२००० रुपये दरम्यान आहे.

दरम्यान, प्रवाशांनी काही ठोस मागण्या पुढे केल्या आहेत. एसी लोकलचे तिकीट दर सर्वसामान्यांना परवडतील अशा पातळीवर आणावेत, साध्या लोकलच्या पासवर काही अतिरिक्त शुल्क देऊन एसी लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी, तसेच पहिल्या वर्ग आणि एसी लोकलच्या दरातील तफावत कमी करावी, अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत.

एसी लोकल सेवा सुरू होऊन आठवडा झाला आहे. प्रवाशांचा प्रतिसादही चांगला आहे. मुख्यतः पहिल्या दर्जाने प्रवास करणाऱ्यांची गर्दी एसी लोकलकडे वळल्याने लोकलच्या धकाधकीतून प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. भविष्यात चांगला प्रतिसाद मिळाल्यास लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर दिला जाईल.- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे