नवी मुंबई : १५ ते १८ वयोगटातील लसीकरण पूर्ण केल्यानंतर आता पालिका प्रशासनाने १२ ते १४ वयोगटातील लसीकरणावर भर दिला असून काही दिवसांपासून वेग आला आहे. यासाठी पालिकेकडे ९२,८०० लसमात्रा मिळाल्या असून सुमारे ४३,३४५ लसमात्रांचे लसीकरण केले आहे.
१६ मार्चपासून या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले असून ४७,४५९ लाभार्थी असून पहिली मात्रा ३६,८२१ तर दुसरी मात्रा ६,५२४ जणांना देण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेने लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन केल्यामुळे १८ वर्षांवरील वयोगटात लसीकरणाचे पहिल्या व दुसऱ्या मात्रेचे १०० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. तसेच १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे लसीकरणही पूर्ण केले आहे. आता १२ ते १४ वयोगटातील लसीकरणावर भर दिला आहे.
पहिल्या मात्रेचे लसीकरण शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर गेल्या आठवडय़ात बुधवारपासून दुसरी लसमात्रा देणे सुरू केले. मात्र पहल्या दिवशी एकही लाभार्थी लसीकरण केंद्राकडे फिरकला नाही. त्यानंतर पुढील दोन ते चार दिवस अत्यंत कमी लसीकरण होत होते. मात्र देशात पुन्हा करोना रुग्णवाढीचे संकेत मिळाल्यानंतर या लसीकरणाला गर्दी होऊ लागली आहे. गुरुवापर्यंत ६,५२४ जणांना दुसरी लस देण्यात आली आहे.
यासाठी पालिका प्रशासनाने महापालिकेच्या रुग्णालयांसह पालिका व खासगी शाळा मिळून २०८ शाळांत लसीकरण केंद्रे सुरू केली असून लसीकरणाला वेग आला आहे.
लहान मुलांच्या वेगवान लसीकरणासाठी पालिकेने २०४ शाळांमध्ये लसीकरणाचे नियोजन केले असून पालिकेला आतापर्यंत ९२,८०० कोर्बेवॅक्स लसमात्रा मिळाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून दुसऱ्या लसमात्रेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख