बेशिस्त वाहनचालक अन् वेगाच्या अतिरेकाने अपघात

पुण्याहून निघून आपण घाटमाथ्यावर आलो की या अतिधोकादायक ठिकाणांची मालिकाच आपल्यासमोर येते.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ५८ टक्के अपघात चालकांच्या चुकांमुळे; सुरक्षिततेच्या उपायांची कमतरता

पनवेल-कळंबोली ते देहू रोड अशा ९४.५  किमी अंतराच्या द्रुतगती मार्गावरील धोकादायक अशा  ५१ ठिकाणांमध्ये सहा ठिकाणे अधिक अपघातप्रवण आहेत. बहुतांश बळी याच ठिकाणांनी घेतले आहेत. त्यातही बहुतेक अपघात हे पुण्याहून मुंबईला येताना घडले आहेत आणि त्यातील ५८ टक्के अपघात वाहनचालकांच्या चुकीमुळे घडले आहेत.

पुण्याहून निघून आपण घाटमाथ्यावर आलो की या अतिधोकादायक ठिकाणांची मालिकाच आपल्यासमोर येते. अमृतांजन पुलाखालून सुरू होणारा उतार, खंडाळ्यातील एस आकाराचे वळण, आडोशी बोगद्याजवळ, खोपोली उतरतानाची नागमोडी वळणे, पुढे एचओसी कंपनीजवळील नागमोडी उतार, मुंबईकडे येताना ३९ व्या किमीवरील उतार आणि शेवटी सीआरआयएल कंपनीजवळील उतार ही ती अपघातप्रवण ठिकाणे. वाहतूक तज्ज्ञ आणि महामार्ग पोलीस यांच्या मते अमृतांजन पुलापासून ते अगदी भाताणच्याही पुढेपर्यंत लागणारा उताराचा रस्ता हे अपघाताचे एक मोठे कारण आहे.

या मार्गावर जाताना-येताना वाहनांच्या सुरक्षेसाठीच्या अनेक त्रुटी आहेत. या एवढय़ा मोठय़ा सहा वा आठपदरी मार्गाच्या मध्ये सर्वत्र भक्कम दुभाजक असणे आवश्यक आहे. परंतु  कुठे कुठे तर धोक्याच्या वळणांवरही ते नाहीत. या मार्गाची वेगमर्यादा ताशी ८० किमी आहे. वाहने त्याहूनही वेगाने धावतात. अशा परिस्थितीत काँक्रीटच्या चटया जोडल्यासारखा हा मार्ग व्यवस्थित असणे आवश्यक आहे; पण अनेक ठिकाणी तो उखडलेला आहे. अशा रस्त्यांमुळे वाहनांच्या चाकांचे, टायरचे नुकसान होते. टायर गरम होऊन फुटून अपघात होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे वाहतूक अधिकारी सांगतात.

वाहनचालकांचा बेफाम वेग अपघातांना मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत आहे. तसा अनुभवच एका चालकाने सांगितला, की घाटाचा भाग सोडला, तर हा मार्ग तसा सरळसोट. त्यामुळे तेथे काही काळानंतर आपोआपच ताशी ८० किमी हा वेगही कमी वाटू लागतो, असे त्याने सांगितले. अमृतांजनचा उतार लागला, की अनेक वाहनचालक गाडय़ा बंद करतात याने तेलाची बचत होते; परंतु अशा गाडय़ांवर  नियंत्रण मिळविणे अवघड असते.

वाहनचालकांची बेशिस्त

सुसाट वेगाने वाहन चालविणे, त्यामुळे त्यावरील नियंत्रण सुटणे याचबरोबर लेनची शिस्त न पाळणे हेही अनेक अपघातांना कारणीभूत ठरल्याचे महामार्ग पोलीस सांगतात. लेनमध्ये अवजड वाहनांनी येऊ नये, ती केवळ वाहन ओव्हरटेक करण्यापुरती वापरावी, हा साधा नियमही सुशिक्षित म्हणविणारे चालक पाळत नाहीत. लेनमध्ये गाडी दामटविणे यात तर अनेकांना भूषण वाटते. त्यातून अपघात होऊन  बळी जातात. (क्रमश:)

चौदा वर्षांत अनेक अपघात. चौदाशे बळी. सात हजार प्रवासी गंभीर वा किरकोळ जखमी. अगदी अलीकडचे सांगायचे, तर गेल्या साडेपाच महिन्यांत ११७ अपघात, ३९ जण मृत्युमुखी, १६० जण जखमी. ९४.५ किलोमीटरच्या एका लांबसडक पट्टय़ाची ही करणी. हा यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग. दिवसाला सुमारे १२ हजार वाहने वाहून नेणारा. सुटीच्या दिवसांत हाच आकडा २८ हजारांच्या पुढे जातो. कुठे ना कुठे अपघात होतो. काहींचा जीव जातो, अनेकांचा खोळंबा होतो. माणसे हळहळतात, चुकचुकतात. काही काळातच रस्ता धावू लागतो, पुढच्या अपघातापर्यंत.. मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ कमी व्हावा या हेतूने २००२ साली खुला झालेला हा मार्ग आज द्रुतगती मृत्युमार्ग बनला आहे. तो का? त्याला कोण जबाबदार आहे? खुद्द रस्ता, वाहनचालक, वाहतूक यंत्रणा की आणखी काही? या प्रश्नांचा वेध..

अपघाताची कारणे

* वाहनचालकाच्या चुकीमुळे – ५८ टक्के

* वाहनातील बिघाडामुळे – १३ टक्के

* मार्गातील उणिवा – १ टक्का

* मार्गातील उणिवा व वाहनातील बिघाडामुळे – २ टक्के

* मार्गातील उणिवा व मानवी चुकांमुळे – २२ टक्के

* (ऑक्टोबर २०१२ ते १४ या वर्षांतील ३७२ अपघातांचा अभ्यास करून जे. पी. रीसर्च या कंपनीने दिलेल्या अहवालानुसार)

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Accident at mumbai pune expressway