नवी मुंबई: आज दुपारी बाराच्या सुमारास उरण फाटा ते किल्ले गावठाण दरम्यान झालेल्या अपघातात एका कारचा चकणाचुर झाला मात्र यात कोणालाही साधे खरचटलेही नाही. अपघात झाल्या नंतर गाडीची अवस्था पाहता यातील व्यक्ती वाचल्या असतील यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. उरण फाटा ते जेएनपीटी मार्गावर कंटेनर, ट्रक, टँकर, डंपर अशा वाहनांची प्रचंड वाहतूक कायम असते. याच मार्गावर उरण फाटा ते किल्ले गावठाण दरम्यान पारसिक हिलच्या पायथ्याला निलगिरी सोसायटी बस थांबा जवळ एक डंपर रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आला होता. त्याच्या मागून एक कार भरघाव वेगात आली. मागून येणाऱ्या कार कडे लक्ष न देता हा डंपर चालकाने गाडी सुरु करून उजवीकडे रस्त्याच्या मुख्य मार्गिकेकडे जाण्यासाठी वळवली. मागून येणाऱ्या कारलाही नाइलाजाने उजवीकडे गाडी घ्यावी लागली त्यात दुर्दैवाने मागून एक डंपर वेगात येत होता त्या डंपरने मात्र ना आपली मार्गिका बदल केला ना वेग कमी केला. परिणामी या दोन्ही डंपरच्या मध्ये ही कार पूर्ण दबली गेली. अपघात झाल्यावर दोन्ही डंपर चालकांनी गाड्या थांबवल्या. आणखी वाचा-तुर्भेतील इंदिरानगरमधील खुल्या व्यायामशाळेच्या सामानाची तोडफोड, गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी परिसरातून जाणाऱ्या काही गाड्या वाहन चालकांनी थांबवून मदत करून कार चालकाला बाहेर काढले. त्यांच्या समवेत अजून एक व्यक्ती होता. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी पथक पाठवले. अशी माहिती गोरे यांनी दिली. मात्र रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु असेल त्यामुळे गुन्हा नोंद केल्यावर पूर्ण माहिती देऊ शकेल असे गोरे यांनी स्पष्ट केले.