पनवेल महापालिकेची प्रोत्साहनपर योजना; प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाटी
पनवेल : महापालिका प्रशासन मालमत्ता कर भरणाऱ्यांना सहा लाखांचा अपघात विमा देण्याचे ठरवले आहे. तसा ठराव केला असून तो लवकरच सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
पनवेल महापालिकेच्या आयुक्तांनी शहरातील मालमत्ताधारकांच्या सुरक्षेसाठी दोन कोटी रुपये खर्च करून ही अपघात विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या विमा योजनेचा लाभ तीन लाख मालमत्ताधारक व त्यांचे कुटुंबीय आशा सुमारे १२ लाख नागरिकांना होणार आहे. विशेष म्हणजे जे मालमत्ताधारक कर भरतात त्या सर्वाना या योजनेचा मोफत लाभ उचलता येणार आहे. ही योजना लागू झाल्यानंतर मालमत्ताधारक पती, पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना सहा लाख रुपयांचा विम्याचा लाभ मिळणार आहे.
पनवेल पालिका क्षेत्रात यापूर्वी अनेक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या अभिष्ठचिंतनाच्या दिवशी नागरिकांसाठी अशा समूह विमा योजना काढून दिल्या आहेत. नागरिक म्हणजेच मतदारांच्या सुरक्षेसाठी काढलेल्या वैद्यकीय किंवा अपघाती विमा योजनेचा लाभ अनेकांनी मिळविला आहे. परंतु पनवेल पालिकेच्या स्थापनेनंतर गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच पालिका प्रशासनाने नागरिकांसाठी ही अपघात विमा योजना आणली आहे.
पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी या योजनेचा प्रस्ताव पालिकेच्या याच महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेतील विषयामध्ये मांडला आहे. संबंधित योजनेमध्ये कुटुंबाच्या व्याख्येमध्ये पती, पत्नी, ३० वर्षे वयांची दोन मुले (अविवाहित मुलीच्या वयाची मर्यादा नाही), आई वडील, अपंग मुले (अविवाहित) यांचा समावेश आहे.
पालिका क्षेत्रात एकापेक्षा अधिक मालमत्ता असल्या तरीही एकच मालमत्ता गृहीत धरून लाभ दिला जाईल. मालमत्ताधारकांच्या दोन अपत्यांपैकी एकाचा किंवा पालकांचा अपघाती मृत्यू झाल्यास तीन लाख रुपयांची विम्याची रक्कम मिळेल. सर्वात महत्त्वाचे या विमा योजनेमध्ये कुटुंबातील व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यास कुटुंबातील सर्वाना मिळून किंवा एका व्यक्तीला एका वर्षांमध्ये दवाखान्यातील जास्तीत जास्त सव्वा लाख रुपयांचा वैद्यकीय खर्च मिळणार आहे. तातडीच्या वैद्यकीय खर्चात रुग्णवाहिकेचा वापर झाल्यास पाच हजार रुपये खर्च मिळू शकणार आहे. अपघातादरम्यान पूर्णत: कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ६ लाख रुपये संबंधित कुटुंबातील व्यक्तीला मिळू शकतील. मात्र लाभ मिळण्यासाठी मालमत्ताधारकांना थकीत मालमत्ता कर भरावा लागणार आहे.
मुळात आपण जो मालमत्ता कर गोळा करतो, तो जनतेला सेवासुविधा उपलब्ध करण्यासाठी. अपघात विमा योजना हा त्याचाच एक भाग आहे. या योजनेचा नागरिकांवर कोणताही भार येणार नसून पालिका प्रशासन याचा प्रीमियम भरणार आहे. नागरिकांनी मालमत्ता कर भरावा म्हणून ही योजना नाही तर नागरिकांच्या कल्याणासाठी आहे. ही योजना नागरिकांनी कर भरावा यासाठी आकर्षणासाठी नक्की नाही. -गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका