नवी मुंबई : लोकलमधील प्रवाशाला मारहाण करून त्याचा मोबाइल हिसकावून पळून गेलेल्या आरोपीला थेट उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. त्याने हिसकावून घेतलेला मोबाइलही जप्त करण्यात आला आहे.
मोहम्मद आरिफ मनी अन्सारी असे अटक आरोपीचे नाव आहे. विचुंबे गावात राहणारे विकास हनुमंता संदीपोग हे फेब्रुवारी महिन्यात वडाळा ते पनवेल असा लोकलने प्रवास करत होते. दरम्यान सीवूड्स रेल्वे स्टेशनमध्ये तीन आरोपी घुसले. त्यांनी चोरीच्या उद्देशाने विकास यांना आरोपींनी फिर्यादीस लोकल खाली खेचून मारहाण करत मोबाइल हिसकावून घेत पळून गेले होते.
या बाबत पोलिसांनी दरोडा कलमान्वये गुन्हा नोंद केला होता. मोबाइल सात हजारांचा होता, मात्र आरोपींनी कायदा काहीच करू शकत नाही, या आविर्भावात हे कृत्य केले. ‘गुन्हा करा आणि गावी उत्तर प्रदेशमध्ये पळून जा’ अशा विचाराने केलेले कृत्य चांगलेच अंगलट आले.
वाशी रेल्वे स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी या गुन्ह्य़ातील आरोपीचा छडा लावण्यासाठी सायबर शाखेची मदत घेतली. फिर्यादीचा मोबाइल लोकेशन उत्तर प्रदेश, सुलतानपूर येथे आढळून आल्यावर तत्काळ पाच जणांचे पथक रवाना केले. स्थानिक पोलिसांची मदत घेतली. मात्र आरोपी सारखे ठिकाण बदलत असल्याने तो सापडत नव्हता. अखेर ७ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अमेठी येथे त्याचे ठिकाण भेटल्यावर या ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेत नवी मुंबईत आणले. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी फर्माविण्यात आली आहे,अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसकर यांनी दिली.
