scorecardresearch

‘बदलापूर’ सिनेमाची आठवण करून देणारी घटना नेरुळमध्ये, तब्बल २५ वर्षांनी उगवला सूड, वाचा नेमकं काय घडलं..

सावजी उर्फ मंजिरी पटेल हत्येचे धागेदारे २५ वर्षांपूर्वीच्या एका हत्येशी निगडित असून, गावातील दोन गटांतील वादात पटेल यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे.

Savji Patel murder case
'बदलापूर' सिनेमाची आठवण करून देणारी घटना नेरुळमध्ये, तब्बल २५ वर्षांनी उगवला सूड, वाचा नेमकं काय घडलं.. (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नवी मुंबई : १५ मार्चला संध्याकाळी पाचच्या सुमारास मुंबईतील नेरुळ सेक्टर ६ येथे सावजी मंजिरी उर्फ पटेल या बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या झाली होती. ही हत्या बांधकाम व्यावसायिकांच्या स्पर्धेत झाली असावी, असा अंदाज सुरवातीला होता. मात्र या हत्येचे धागेदारे २५ वर्षांपूर्वीच्या एका हत्येशी निगडित असून, गावातील दोन गटांतील वादात पटेल यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी एक रेकी करणारा, एक गोळ्या झाडणारा, तर एक दुचाकी चालवणारा आणि सुपारी देणाऱ्यापैकी एक असे एकूण चार आरोपी अटक करण्यात यश आले आहे. या प्रकरणाचा पूर्ण उलगडा झाला असला तरी सर्व मारेकरी अद्याप अटक करण्यात आलेले नसल्याने पूर्ण माहिती देण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शिवली.  

मेहेक नारिया, कौशल यादव, गौरव कुमार यादव, सोनुकुमार यादव असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील मेहेक याला गुजरातमधून, तर अन्य आरोपींना बिहार येथून अटक करण्यात आलेली आहे. आरोपी अन्यत्र पळून जाऊ नये म्हणून वेगवान हालचाली करीत त्यांना अटक करण्यासाठी विमानाने पथक तेथे रवाना झाले होते. तेथील उच्च पदस्थ एका पोलीस अधिकाऱ्याने या कामी नवी मुंबई पोलिसांना मोलाची मदत केली. पटेल यांची हत्या झाल्यानंतर ४८ तासांत पोलिसांना या प्रकरणातील सत्य समजले होते. मात्र आरोपी किती? कोण? या बाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा – नवी मुंबई : महालक्ष्मी सरस प्रदर्शन आणखी एक दिवसाने वाढवले, सोमवारी शेवटचा दिवस

१५ मार्चला संध्याकाळी पाचच्या सुमारास सावजी मंजिरी उर्फ पटेल हे नेरुळ सेक्टर ६ अपना बाजार समोरील आपल्या कारमध्ये जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांना गोळ्या झाडल्या होत्या. त्यात दोन छातीत आणि एक पोटात गोळी लागल्याने त्यांचा जागेवर मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी आले होते. स्वतः आयुक्त भारंबे या प्रकरणात लक्ष देत पाठपुरावा करीत होते. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपास करीत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले, अशी माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच आरोपींना हस्तांतर कोठडीअंतर्गत लवकरच नवी मुंबईत आणले जाणार आहे, असेही भारंबे यांनी सांगितले. 

पार्श्वभूमी 

हेही वाचा – नवी मुंबई : पावसाने पालेभाज्या खराब; मेथी, कोथिंबीरला अधिक फटका

गुजरात येथील सायंगाव, तालुका रापर, जिल्हा कच्छ हे पटेल यांचे मूळ गाव आहे. गावातील वाद आणि २५ वर्षांपूर्वी बचूभाई पटनी या इसमाच्या  झालेल्या हत्येचा बदला म्हणून मंजिरी उर्फ पटेल यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. पटनी यांची हत्या सावजी यानेच केली असल्याचे आजही गावात बोलले जात असून त्याला या प्रकरणात अटकही करण्यात आली होती. ११ महिने तुरुंगात राहिल्यावर त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या गावात सावजी पटेल याचे वागणे अरेरावीचे असल्याने त्यांच्याविषयी चीड निर्माण झाली होती. त्यात दोन महिन्यांपूर्वी सावजी याचे नारिया यांच्या कुटुंबासोबत जमिनी आणि जुन्या वादावरून भांडण झाले होते. कदाचित सावजी आपल्याला ठार करेल, अशी भीती वाटत असल्याने त्यापूर्वीच आपण त्याला संपवावे म्हणून ही हत्या करण्यात आली. यासाठी बिहार येथील तीन आरोपींना २५ लाखांची सुपारी देण्यात आली होती .

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 18:46 IST

संबंधित बातम्या