अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ६० वाहन चालकांवर कारवाई

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ६० वाहन चालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली आहे.

पनवेलच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयासमोर जप्त केलेल्या वाहनांची रांग लागली आहे.

पनवेल-सायन महामार्गावर कळंबोली सर्कल ते खारघर दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ६० वाहन चालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली आहे. या वाहतुकीमुळे तीन आसनी रिक्षाचालकांना फटका बसला होता. सलग पंधरा दिवस ही मोहीम राबवून प्रादेशिक नियंत्रकांनी सुमारे ३२ वाहने ताब्यात घेतल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांनी दिली. यामुळे पनवेलच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयासमोर जप्त केलेल्या वाहनांची रांग लागली आहे.
कळंबोली सर्कल ते खारघर रेल्वे स्थानक या टप्प्यात मोठय़ा प्रमाणात इको, मॅक्सीमो, टाटा छोटा हत्ती ही वाहने प्रवासी वाहतूक करतात. एका वाहनात पाच प्रवासी बसवण्याची परवानगी असताना या बेकायदा वाहतूकदारांनी दहा प्रवासी बसविण्याची प्रथा सुरू केली. नोकरदार महिलांनाही अशाच दाटीवाटीत प्रवास करावा लागतो. या बेकायदा वाहतुकीमुळे येथील तीन आसनी रिक्षांना शेअर प्रवासासाठी प्रवासी मिळेनासे झाले. यामुळे रिक्षाचालकांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेत प्रादेशिक परिवहन विभागाने कळंबोली सर्कल ते खारघरदरम्यान धावणारी ही बेकायदा वाहने जप्त केली. या वाहनांच्या मालकांना दंडात्मक कारवाईसाठी पनवेलच्या न्यायालयात हजर केले जाणार असून त्यानंतर दंडाची रक्कम ठरेल.
=-=-

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Action against illegal passenger transport