scorecardresearch

बेकायदा बांधकामांवरील कारवाईत पक्षपात?; महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जुजबी कारवाई होत असल्याने आश्चर्य

शहरात अगोदरच बेकायदा बांधकामांचा प्रश्न गंभीर असताना करोनाकाळात दुर्लक्ष झाल्याने बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहे.

बेकायदा बांधकामांवरील कारवाईत पक्षपात?; महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जुजबी कारवाई होत असल्याने आश्चर्य
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जुजबी कारवाई होत असल्याने आश्चर्य

नवी मुंबई : शहरात अगोदरच बेकायदा बांधकामांचा प्रश्न गंभीर असताना करोनाकाळात दुर्लक्ष झाल्याने बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहे. असे असताना महापालिका प्रशासन गेले काही दिवसांपासून काही निवडक बांधकामांवरच कारवाई करीत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यात गणेशोत्सवाच्या धामधुमीत ही कारवाई होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नवी मुंबईत बेकायदा बांधकामे ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासन अशा बांधकामांचे वेळीच सर्वेक्षण करून त्याची आकडेवारी जाहीर करीत नसल्याने अधिकृत आकडेवारी समोर येत नाही. मात्र शहरातील एकूण परिस्थिती पाहता मोठय़ा बेकायदा बांधकामांचे इमले उभे राहत आहेत. करोनाकाळात तर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आता या बांधकामांचे प्रमाण दुपटी, तिपटीने वाढले आहे. गावठाण भागात विशेषत: बेकायदा बांधकामांचे प्रमाण अधिक आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिका व सिडको प्रशासनाने तोडक कारवाई हाती घेतली असल्याचे जाहीर केले, मात्र काही जुजबी करावाईनंतर ही मोहीम पुन्हा थांबवण्यात आली.

एमआयडीसी भागातही अनधिकृतपणे नवीन वसाहती उभ्या राहत आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील शहरी, ग्रामीण व झोपडपट्टी भागात एकाच वेळी बेकायदा बांधकामांना पेव फुटले असून पालिका अतिक्रमण विभाग होता तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने गेल्या दोन आठवडय़ांपासून काही मोजक्या बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. तीन ते चार ठिकाणी ही कारवाई करीत निर्माणाधिन इमारती पाडण्यात आल्या आहेत. गणेशोत्सकाळातच गाजावाजा न करता ही कारवाई सुरू आहे. यामुळे नवी मुंबईत ही मोजकीच बांधकामे बेकायदा आहेत का असा सवाल आता नवी मुंबईकर करीत आहेत. याबाबत प्रशासनाला विचारले असता त्यांच्याकडूनही कारवाईबाबत ठोस उत्तर दिले जात नाही किंवा शहरातील बेकायदा बांधकामांची यादी जाहीर केली जात नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच अशी जुजबी कारवाई करून हा प्रश्न सुटणार आहे का असाही प्रश्न विचारला जात आहे. याबाबत पालिका आयुक्त अभिजीत बांगर व अतिक्रमण उपायुक्त अमरीश पटनिगिरे यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.

बेकायदा इमले उभे राहिल्यानंतरच कारवाई का?

शहरात बेकायदा बांधकामांवर महापालिका प्रशासनाकडून जी जुजबी कारवाई होते, त्यात बहुतांश बांधकामांचे काही मजले उभे राहिल्यानंतर होते. या बांधकामांना पालिका प्रशासन आपण बेकायदा बंधकाम करीत असल्याची नोटीसही जाहीर करीत असते. तरीही ही बांधकामे सुरू असतात. त्यानंतर काही मजले उभे राहिल्यानंतर काही मोजक्या बांधकामांना आपण नोटीस देऊनही बांधकाम सुरू ठेवल्याने तोडक कारवाई करीत असल्याचा दावा केला जातो. मात्र हा सर्व प्रकार संशायस्पद आहे. त्यामुळे प्रशासनाने बेकायदा बांधकामांची यादी जाहीर करून त्यावर सरसकट कारवाईची मागणी होत आहे.

अलीकडची कारवाई

  • गोठीवली गाव खदान तलावाजवळ तीन मजल्यांच्या इमारतीवर हातोडा.
  • खैरणे गावातील तळमजला अधिक तीन मजल्यांच्या इमारतीवर कारवाई.
  • ऐरोली सेक्टर ३ व ऐरोली गावामध्ये इमारतीवर हातोडा.

गुन्हे दाखल केलेल्या बांधकामांचे पुढे काय?

बेकायदा बांधकामांबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त  अमरीश पाटणेगिरी यांनी एप्रिल महिन्यात  आम्ही योग्य ती कारवाई करतो, असे सांगत अशा बांधकामांवर तीन महिन्यांत ३५ गुन्हे नोंद केले असल्याचे सांगितले होते. यावरून या बांधकामांचे प्रमाण किती मोठय़ा प्रमाणात आहे हे लक्षात येते. गुन्हे दाखल केलेल्या बांधकामांचे पुढे काय झाले याबाबतही सांगितले जात नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर ठोस पावले उचलत दोषारोपपत्र दाखल करणे गरजेचे आहे, मात्र असे होत नाही हे उघड सत्य आहे. त्यामुळे प्रशासनाने राजकीय दबाव बाजूला ठेवत अधिकार वापरले तरीही बेकायदा बांधकामांना वचक बसू शकतो, असे माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी सांगितले.

नवी मुंबईत अनेक विभागांत बेकायदा बांधकामे होत आहेत. घणसोली, ऐरोली, दिघा विभागात हे प्रमाण अधिक आहे. याला पालिका जबाबदार असून तेथील लोकप्रतिनिधीही आहेत. त्यांनी याबाबत जाब विचारण्याची गरज आहे. 

– किशोर पाटकर, माजी नगरसेवक

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.