नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचा इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझ्या प्रशासकीय कारकीर्दीत मी अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. या ठिकाणी चार महिन्यांत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या तीन अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. आवश्यकता पडली तर आणखी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. मी शांत आहे याचा अर्थ कारवाई करणार नाही असा कोणी घेऊ नये. माझ्यावर कोणीही दबाव टाकू शकणार नाही, असे रोखठोक प्रतिपादन नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी ‘लोकसत्ता महामुंबई’ला दिलेल्या मुलाखतीत केले. माझ्या बदलीच्या केवळ अफवा पसरवल्या जात असून मी सध्या रात्री आठ वाजेपर्यंत काम करत आहे. मी कामाला न्याय देणार माणूस आहे. कोणतीही प्रसिद्धी न करता मी संपूर्ण शहराची भ्रमंती केली आहे. त्यामुळे शहराच्या समस्यांची कल्पना आली असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबईचे माजी वादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची चार महिन्यांपूर्वी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अंत्यत शांत, संयमी आणि कार्यक्षम असे राज्य मुद्रांक शुल्क महासंचालक डॉ. रामास्वामी एन. यांची नियुक्ती झाली. पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉ. रामास्वामी एन. दीर्घ रजेवर गेल्याने त्यांना पालिका आयुक्त म्हणून काम करण्यात रस नसल्याची चर्चा सुरू झाली. ती आजही सुरू आहे. नवी मुंबई पालिका आयुक्तपदात मला रस नाही हे फक्त मी सांगू शकतो, इतर केवळ अफवा पसरवू शकतात. ही गोष्ट खरी आहे की चार वर्षांत तीन ठिकाणी बदली झाल्याने मी प्रारंभी नाराज होतो. राज्य शासनाकडून सारखी बदली केली जात होती. माझी मुलगी आता चौथीत आहे. तिच्या शिक्षणाच्या दृष्टीने किमान तीन वर्षे तरी एका ठिकाणी काम मिळणे आवश्यक वाटत होते. त्यामुळे नवी मुंबईत आल्यानंतर मी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती, पण शासनाने विचारपूर्वक हा पदभार दिला असल्याचे स्पष्ट केल्यानंतर मी झोकून देऊन काम करू लागलो. कामाला न्याय देण्यासाठी सरकारने मला इथे बसविले आहे. नवी मुंबई एक छोटे शहर असले तरी भविष्याच्या दृष्टीने शहरी भागाचा अभ्यास आवश्यक असल्याने सनदी नोकरीत शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव करून चालत नाही, असेही डॉ. रामास्वामी यांनी स्पष्ट केले.

पायाभूत सुविधांना प्राधान्य

शहरात अनेक ठिकाणे अपघातप्रवण आहेत. मागील सहा महिन्यांत १५० वाहनचालकांचा बळी गेला आहे. त्यामुळे शहरातील सिग्नल व्यवस्था, पायाभूत सुविधा सुधारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. या संदर्भात पोलीस उच्च अधिकाऱ्यांबरोबर बैठका झाल्या आहेत, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

शिक्षण, आरोग्यावर भर देणार

शिक्षण आणि आरोग्य या दोन सुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे. लवकरच दोन्ही रुग्णालयांसाठी कर्मचारी व डॉक्टर यांची भरती केली जाणार आहे. राज्य शासनाने ११०० वैद्यकीय कर्मचारी भरतीला मंजुरी दिलेली आहे. प्रशासनासाठीही ९५२ कर्मचारी मिळणार आहेत. शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी स्मार्ट क्लास ही संकल्पना अमलात आणली जाणार आहे. त्या आधी शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action will be taken against the corrupt officials say nmmc chief
First published on: 01-08-2017 at 02:49 IST