नवी मुंबई – नवी मुंबई शहरात दळणवळणाच्या जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याबरोबरच नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने वॉकॅबिलिटी वाढवण्यासाठी शहरात आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध प्रकल्प राबवले जात आहेत. शहरातील नागरिकंच्या तंदुरुस्तीसाठी पालिकेने १ नोव्हेबर २०१८ पासून राबवलेल्या युलू सायकल व ई बाईक्स प्रकल्पाला भरभरून प्रतिसाद मिळाला असून, करोनाच्या काळात व त्यानंतर मात्र नागरिकांचा कल सायकलकडून ई बाईक्सकडे वळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबईत पुन्हा एकदा नव्या जोमाने ई बाईक प्रणाली सुरू झाली आहे. एकीकडे युलू सायकलचा कमी वापर केला जात असल्याचे चित्र असून दुसरीकडे हवे तिथे बाईक पार्क करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून सातत्याने असे प्रकार आढळल्यास २०० रुपये दंड, तसेच रजिस्टरनंबर रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे हवे तिथे या बाईक पार्क करणाऱ्यांवर आता बारीक लक्ष असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या शहरात ३४६ नव्या ढंगातील ई बाईक्स सेवेत आहेत. नवी मुंबईकरांचा युलू सायकल व ई बाईक्स प्रकल्पाला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या प्नकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत असताना नागरिकांची ई बाईक्स वापरण्याकडे कल असून या बाईकचा नियमबाह्य वापर करण्यात येत आहे. ई बाईक्स घेतल्यानंतर बाईक्सचे स्टॅण्ड असलेल्या ठिकाणीच पुन्हा पार्क करणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याच वेळा या बाईक विविध ठिकाणी पाहायला मिळतात. तर काही ठिकाणी या बाईकची तोडफोड झाल्याचेही निदर्शनास आले आहे. मुंबई शहराची निर्मिती सिडकोने नियोजनबद्धरित्या केल्यानंतर नवी मुंबई महापलिकेच्या माध्यमातून शहराचा विकास करण्याचे काम करण्यात आले आहे. शहरातील
नागरिकांना चांगल्या भौतीक सुविधा देण्याबरोबरच शहरातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे व त्यांना विविध योजना व प्रकल्पांद्वारे चांगल्या सुविधा देण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून केले जात आहे. शहरातील विविध ८ विभाग कार्यालयाअंतर्गत शहरातील रस्ते, दळणवळणाच्या सोयी व इतर सोयीसुविधा देताना देखणी व चांगली उद्याने पालिकेने केली आहेत. तसेच शहरात सुरू करण्यात आलेल्या युलू सायकल व ई बाईकला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : पाडव्याच्या मुहूर्तावर हापूसची आवक वाढण्यास सुरुवात; दर स्थिर

युलू सायकल प्रमाणेच युलू इ बाईकलासुद्धा मोठा प्रतिसाद मिळाला असून नव्या ढंगातल्या ई बाईक्स सर्वांना आकर्षित करीत आहेत. परंतु या ई बाईक्सला हव्या त्या ठिकाणी रस्त्यात उभ्या करण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. कधी उड्डाणपुलावर तर कधी रस्त्याच्या एका कोपरऱ्यात या बाईक्स उभ्या केल्या जात असल्याने आता अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने बाईक्सचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहेत. या बाईक्सची जीपीएस ट्रॅकरद्वारे माहिती संबंधित कंपनीकडे प्राप्त होते. त्यामुळे ज्याने ई बाईक चुकीच्या ठिकाणी पार्क केली असल्यास तात्काळ ते समजत असून मार्शलकडून त्या बाईक पुन्हा आहे त्या ठिकाणी कंपनीकडून आणून ठेवल्या जातात. तसेच संबंधित वापर करणाऱ्यांना याबाबात दुरध्वनीद्वारे सूचना करण्यात येते, परंतु वारंवार असे केल्यास मात्र कंपनीकडून रजिस्टर आयडी बंद केला जाणार आहे.

ई बाईकमुळे प्रदूषणालाही आळा बसत असून तरुणांमध्ये ई बाईक चालवण्यासाठीची उत्सुकता पाहायला मिळते. ज्यांनी याआधी युलू अ‍ॅप डाऊनलोड व रजिस्टर केले आहे. त्यांना या नव्या ई बाईक्सचा वापर करता येत आहे. परंतु चुकीच्या पद्धतीने हवे तिथे ई बाईक पार्क करणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात यत असल्याची माहिती संबंधित कंपनीने दिली आहे. देशात ई बाईक प्रणालीचा शुभारंभ बंगलोर या ठिकाणी प्रथम सुरू असून ई बाईक प्रणाली सुरू करणारे नवी मुंबई हे देशातील दुसरे तर महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले होते. आता त्यात आणखीनच भर पडत असून ई बाईक्सचा वापर अधिक केला जात आहे. परंतु, बेशिस्तीने या ई बाईक्सचा वापर करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई तसेच व्यक्तिचा नोंदणी क्रमांकच रद्द केला जाणार आहे.

सध्या शहरात ३४६ ई बाईक्स ठेवण्यात आल्या आहेत. शहरात ई बाईक्सचा वापर चांगला होत असून दुसरीकडे हवे तिथे ई बाईक्स पार्क करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कंपनीचे योग्य लक्ष असून अशा व्यक्तींना फोनद्वारे सूचना देण्यात येत असून वारंवार अशा चुका केल्यास त्या व्यक्तीची नोंदणीच रद्द केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची आश्यकता आहे, असे युलू ई बाईक्सचे व्यवस्थापक विकास शिंदे म्हणाले.

हेही वाचा – नवी मुंबई : खैरणे नाल्यावर अजून एक पूल; वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा

नाशिकला ई बाईक्स चोरून नेण्याचा प्रकार समोर

एकीकडे शहरातील ई बाईक्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून या कंपनीची नवी मुंबईसह विविध शहरात ही जनसायकल प्रणाली सुरू आहे. परंतु नुकतीच मुंबई शहरातून ई बाईक्स टेम्पोतून चोरून नाशिकला नेण्याचा प्रकार समोर आला आहे. परंतु जीपीएस प्रणालीमुळे प्रत्येक ई बाईक्स कुठे जाते याची माहिती मिळत असल्याने संबंधित व्यक्तीचा शोध नाशिकमध्ये लागला असून त्याच्याविरोधात बीकेसी येथे कायदेशीर कारवाई करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ई बाईक्सचा नियमानुसारच वापर करावा. तसेच शहराचे विद्रुपीकरण होऊ नये यासाठी कोठेही ई बाईक्स पार्क करणे आता नागरिकांना चांगलेच महागात पडणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action will be taken if yulu cycle is misused in navi mumbai ssb
First published on: 21-03-2023 at 23:00 IST