नवी मुंबई : अंतराळातील अवशेषांमुळे उपग्रहांना होणारी संभाव्य धडक टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या नवी मुंबईच्या अदित्या उप्पल याच्या ‘दृष्टी’ या संकल्पनेला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. ‘वायासॅट : स्पेस फॉर गुड इंडिया चॅलेंज २०२६’ या स्पर्धेत अदित्याने बाजी मारली असून, त्याला पाच लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. अदित्या हा आयआयटी खरगपूर येथे एरोस्पेस अभियांत्रिकीच्या एकात्मिक पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे.

अंतराळातील अवशेषांमुळे कार्यरत उपग्रहांना धोका निर्माण होतो. निकामी उपग्रहांचे तुकडे, रॉकेटचे अवशेष आणि इतर वस्तू पृथ्वीभोवतीच्या कक्षेत फिरत असतात. या वस्तूंची उपग्रहांशी धडक झाल्यास दळणवळण, दिशादर्शन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या उपग्रह सेवांवर परिणाम होऊ शकतो. हा धोका कमी करण्यासाठी अदित्याने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘दृष्टी : अंतराळ कक्ष संरक्षक’ ही संकल्पना मांडली आहे.

या प्रणालीद्वारे धोकादायक अंतराळातील अवशेषांचा स्वयंचलितपणे शोध घेणे, त्यांच्यामुळे उपग्रहाला होऊ शकणाऱ्या धडकेचा धोका ओळखणे आणि धडक टाळण्यासाठी उपग्रहाने कोणती हालचाल करावी, याची गणना करणे शक्य होणार आहे. त्यानंतर वायासॅटच्या उपग्रह जाळ्याच्या माध्यमातून आवश्यक आदेश तत्काळ पाठवण्याची व्यवस्था या संकल्पनेत प्रस्तावित आहे. सध्या धडक टाळण्यासाठी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला काही तास लागू शकतात. हा प्रतिसादाचा कालावधी काही सेकंदांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट या प्रणालीद्वारे ठेवण्यात आले आहे.

उपग्रहांना धडक टाळण्यासाठी वारंवार कक्षा बदलावी लागल्यास त्यांचे इंधन खर्च होते. त्यामुळे धोक्याचा वेळीच अंदाज घेऊन योग्य हालचालींचे नियोजन केल्यास इंधनाची बचत होऊ शकते. उपग्रहांचे आयुष्य वाढवणे आणि अंतराळातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे, हेही या संकल्पनेचे अपेक्षित फायदे आहेत.

वायासॅट कंपनीने भारतीय राष्ट्रीय अंतराळ प्रोत्साहन आणि प्राधिकरण केंद्राच्या भागीदारीत ही स्पर्धा आयोजित केली होती. अंतराळ आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून पृथ्वीवरील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी देशभरातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. अनेक महिन्यांच्या मूल्यमापन प्रक्रियेनंतर अंतिम फेरीतील स्पर्धकांची निवड करण्यात आली. सहभागी विद्यार्थ्यांना वायासॅटच्या अभियंत्यांसह उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांचे मार्गदर्शनही मिळाले.

अंतराळ उद्योगातील तज्ज्ञ, सरकारी प्रतिनिधी आणि उपग्रह तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकारांच्या समितीने संकल्पनांचे नावीन्य, व्यवहार्यता, विस्तारक्षमता आणि संभाव्य सामाजिक परिणाम या निकषांवर मूल्यमापन केले. या निकषांवर अदित्याच्या संकल्पनेची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली.

या स्पर्धेत लखनौ येथील शशांक कुमार सिंह याने द्वितीय, तर नवी दिल्ली येथील आर्यन गुप्ता याने तृतीय क्रमांक मिळवला. शशांक हा आयआयटी गांधीनगर येथे जैविक विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयात पीएचडीचे संशोधन करीत आहे. आर्यन हा आयआयटी रुरकी येथे यांत्रिक अभियांत्रिकीच्या अंतिमपूर्व वर्षात शिकत आहे.

अंतराळातील अवशेषांशी संबंधित समस्येवर काम करताना धडक टाळण्याची प्रक्रिया स्वयंचलित करण्याची कल्पना सुचली. या स्पर्धेमुळे संकल्पना विकसित करण्याचा आणि ती प्रभावीपणे मांडण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला. आपल्या मेहनतीचे फळ मिळाल्याचा आनंद असल्याची भावना अदित्याने व्यक्त केली.