पनवेल पालिका आयुक्तांचा खासगी लसीकरणाचा सल्ला
पनवेल : रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याने पनवेलकर त्रस्त झालेले असताना शासनाकडून लसपुरवठा होत नसल्याने पालिका प्रशासनही त्रस्त झाले आहे. पनवेल पालिकेच्या आयुक्तांनी तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता खासगी केंद्रांवर लसीकरण करून घ्या असा सल्ला पनवेलकरांना दिला आहे.
१८ वर्षांवरील लसीकरण सुरू झाल्यापासून पालिकेच्या व इतर स्वयंसेवी संस्थांच्या १७ केंद्रांवर लसीकरणासाठी प्रत्येक दिवशी गर्दी होत आहे. मात्र लस नसल्याने नागरिकांना परत जावे लागत आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाकडून पनवेल पालिकेला लस साठा मिळतो. त्यानुसार पालिकेला लस नियोजन करावे लागते. मात्र काही दिवसांपासून पालिकेला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. मात्र लसच मिळत नसल्याने लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी खासगी रुग्णालयांत जाऊन लसीकरण करून घेण्याचा सल्ला पनवेलकरांना दिला आहे. मंगळवारी आयुक्तांनी एका खासगी केंद्राशी याबाबत चर्चा करून किमान पनवेल पालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पालिका क्षेत्रातील अजून ६१ खासगी रुग्णालयांमध्ये नागरिक खासगी लसीकरण स्वखर्चाने करून घेऊ शकतील, असे नियोजन पालिकेने केले आहे.
पालिकेच्या केंद्रांवर उपलब्ध लशींप्रमाणे लसीकरण सुरूच आहे. मात्र पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. मात्र तिसऱ्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे लसीकरण करून घ्यावे यासाठी पालिकेने हा पर्याय खुला असल्याचे सांगितले आहे.
– वर्षां कुलकर्णी, जनसंपर्क प्रमुख, महापालिका
