नवी मुंबई : समानता ही आपोआप निर्माण होत नाही, तर ती विचारांतून आणि कृतीतून रुजवावी लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचले तरच खऱ्या अर्थाने लोकशाही समाजात रुजेल, असा ठाम विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केला. स्त्रियांना समान मतदानाचा हक्क देण्यासह अनेक कायद्यांद्वारे बाबासाहेबांनी स्त्रीमुक्तीचा पाया रचला, असेही त्यांनी नमूद केले.

नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ऐरोली सेक्टर १५ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ३ ते १३ एप्रिलदरम्यान आयोजित ‘जागर २०२६’ व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास महापौर सुजाता पाटील, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, नगरसेविका ऐश्वर्या सोनावणे, उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, लेखक-उद्योजक प्रफुल्ल वानखेडे आदी उपस्थित होते.

स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य करताना देशपांडे यांनी स्त्रीला देवी म्हणून पूजणे किंवा दासी म्हणून हिणवणे या दोन्ही टोकाच्या भूमिका चुकीच्या असल्याचे सांगितले. स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारणे हीच खरी समानतेची सुरुवात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. समाजातील स्त्रीच्या योगदानाची केवळ जाणीव ठेवून उपयोग नाही, तर ती प्रत्यक्ष व्यवहारात मान्य करून अंगीकारणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठीचा लढा, दारूबंदी चळवळ, तसेच महिलांच्या मालमत्तेवरील हक्कासाठी केलेले आंदोलन यांचे उदाहरण देत त्यांनी महिलांच्या नेतृत्वाची ताकद अधोरेखित केली. संसार हा दोन चाकांचा रथ असला, तरी निर्णयाचे नियंत्रण पुरुषांकडेच असल्याची वस्तुस्थिती बदलून समानतेवर आधारित नाते निर्माण होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

आज महिला विविध क्षेत्रात आघाडीवर असून नोकरी, व्यवसाय आणि घर या तिन्ही आघाड्यांवर त्यांना मोठी कसरत करावी लागते. ‘सुपर वूमन’ होण्याच्या दबावातून बाहेर पडत आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला त्यांनी दिला. स्त्रिया प्रत्यक्षात लोकशाही अधिक प्रभावीपणे जगतात, कारण त्या सर्वांना सहभागी करून घेण्याची क्षमता ठेवतात, असेही त्यांनी नमूद केले. व्याख्यानाच्या शेवटी उपस्थितांनी लिंगभेद, जातभेद न करण्याची, हुंडा प्रथा टाळण्याची आणि मुलगा-मुलगी समान मानण्याची सामूहिक शपथ घेतली.

बाबासाहेबांच्या अधिकारामुळेच महिलांना नेतृत्वाची संधी : महापौर सुजाता पाटील

महापौर सुजाता पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी बाबासाहेबांना अभिवादन करत त्यांच्या विचारांनी समाजात परिवर्तन घडवून आणल्याचे सांगितले. संविधानातून मिळालेल्या अधिकारांमुळेच महिलांना महापौर, नगरसेविका यांसारख्या पदांवर काम करण्याची संधी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध योजना राबविण्यात येत असून ‘लखपती दीदी’ योजना तसेच एनएमएमटी बससेवेत महिलांना चालक म्हणून प्रशिक्षण व रोजगार देण्याचे उपक्रम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

रविवारी ‘अनप्लग्ड जलसा’

‘जागर २०२६’ व्याख्यानमालेअंतर्गत रविवारी (५ एप्रिल) सायंकाळी ६.३० वाजता आंबेडकरी गीतांचा ‘अनप्लग्ड जलसा’ सादर होणार आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या गायिका रसिका व कृतिका बोरकर या कार्यक्रमात सहभागी होणार असून, ज्येष्ठ पत्रकार विनोद राऊत त्यांच्या संगीतमय प्रवासावर संवाद साधणार आहेत. आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.