दिघा, ऐरोली, घणसोलीतील पाणी टंचाईवर पालिकेचा उपाय

विकास महाडिक
नवी मुंबई : नवी मुंबईतील उत्तर व दक्षिण भागातील नोडमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागल्याने पालिकेने जल नियोजनासाठी पुढाकार घेतला असून सिडकोच्या गृहनिर्माण संस्थांना भूमिगत जलकुंभ बांधण्याचा सल्ला दिला आहे. शहराची लोकसंख्या वाढू लागली असून पाण्याचा दाब कमी होऊ लागला आहे. त्यामुळे पाचव्या सहाव्या मजल्यांवर पाणी पोहचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावर भूमिगत व उच्चस्तरीय जलकुंभ हा पर्याय असल्याचे एकमत तयार झाले आहे.

पाणी नियोजनाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून पेणमधील हेटवणे, खालापरमधील पाताळगंगा आणि कर्जतमधील कोंढाणे धरणातील पाण्यावर पालिका दावा सांगणार आहे. हेटवणे धरणातील ५० दशलक्ष लिटर पाण्यावर यापूर्वीच दावा करण्यात आला असून त्यासाठी लागणारा खर्च करण्याची तयारी देखील पालिकेची आहे.

नवी मुंबईची लोकसंख्या आता १५ लाखांच्या वर गेली आहे. राज्य सरकारने वाढीव चटई निर्देशांक मंजूर केल्याने जुन्या मोडकळीस आलेल्या सिडको इमारतींच्या जागा यानंतर आता टोलेजंग इमारती घेणार आहेत. त्यामुळे शहरांची लोकसंख्या दुप्पट वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या पाण्याचे नियोजन सिडकोने करण्यास सुरुवात केली असून पालिकेनेही जल आराखडा तयार करण्यास घेतला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सिडकोच्या दिघा, ऐरोली, घणसोली या उत्तर भागात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. मोरबे धरणापासून येणाऱ्या पाण्यांच्या जलवाहिन्यासाठी जवळ असलेल्या बेलापूर, नेरुळ आणि सानपाड या शहरात यापूर्वी पाण्याचा तुटवडा जाणवत नव्हता, मात्र आता तोही तुटवडा जाणवू लागला आहे. सिडकोने बांधलेल्या चार ते पाच मजल्याच्या इमारती या नोडमध्ये मोठय़ा प्रमाणात आहेत. या इमारतींसाठी उच्चस्तरीय जलकुंभांची व्यवस्था सिडकोने त्यावेळी केलेली आहे. मात्र लोकसंख्या वाढल्याने पालिकेच्या पाण्याचे वितरण जास्त प्रमाणात झाले आहे. त्यामुळे कमी दाबाने या इमारतींना मिळणारे पाणी आता उच्चस्तरीय जलकुंभापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे इमारतींच्या वरील जलकुंभ भरत नसल्याने रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्तीने येणारे पालिकेचे पाणी साठविण्यासाठी आता कमी पुरवठा होणाऱ्या सर्वच गृहनिर्माण संस्थांनी इमारतींच्या खालील भागात भूमिगत जलकुंभ बांधण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

गृहनिर्माण संस्थांनी हे जलकुंभ उभारल्यास पालिकेचे पाणी त्या जलकुंभात जमा होऊ शकणार असून त्यानंतर पंपाद्वार ते पाणी इमारतीच्या वरील जलकुंभात सोडता येणार आहे. त्यामुळे रहिवाशांना पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही. कमी पुरवठय़ावर पालिकेने हा तोडगा काढला असून त्यासाठी प्रत्येक गृहनिर्माण संस्थांना भूमिगत जलकुंभ बांधण्याचा सल्ला दिला जाणार आहे.

ग्रामीण भागात उभ्या राहणाऱ्या भरमसाठ बेकायदा बांधकामामुळे पालिकेच्या या पाणीपुरवठा वितरण यंत्रणेवर विपरीत परिणाम झालेला आहे.

नवी मुंबईतील काही भागात आता पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी नव्याने नियोजन केले जात असून गृहनिर्माण संस्थांनी भूमिगत जलकुंभ बांधण्यावर आता लक्ष देण्याची आवश्यकता आहे. केवळ उच्चस्तरीय जलकुंभाने पाणी पोहचणार नाही. याशिवाय पालिका हेटवणे धरणातील पाण्यावर दावा करीत असून सिडकोच्या कोंढाणे धरणातील पाण्यावर पालिकेचे लक्ष आहे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका

हेटवणे, पाताळगंगा, कोंढाणे धरणातील पाण्यावर दावा

नवी मुंबईची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याने भविष्यात लागणाऱ्या पाण्याचे नियोजन आजपासून करणे आवश्यक असल्याने पालिकेने जलसंपदा विभागाच्या पेण येथील हेटवणे धरणावर ५० दशलक्ष लिटर पाण्यावर दावा सांगितला आहे. त्यासाठी लागणारे स्वामीत्व धन देण्यास पालिका तयार आहे.  मिरा भाईंदर भागाला एमआयडीसीला बारवी धरणातील पाणी द्यावे लागत असल्याने पालिकेला लागणारे ७० दशलक्ष लिटर पाण्यामध्ये १०दशलक्ष लिटरने कपात होत आहे. त्यामुळे एमआयडीसी भागात पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यावर पालिका उपाय योजना करताना मोरबे धरणात पाताळगंगा नदीतून पावसाळ्यात पाणी आणून सोडण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे. त्यामुळे मोरबे धरणाची क्षमता ४५० दशलक्ष लिटरपेक्षा वाढणार आहे.