Kharghar Accident / पनवेल – “थांबा… थांबा…” असा जीवघेणा आर्त आवाज हवेत विरत असताना, एका तरुणाचे आयुष्य निर्दयी चाकाखाली चिरडले गेले. न्यायासाठी लढणाऱ्या एका होतकरू वकिलाचा जीव, निष्काळजीपणाच्या क्रूर क्षणात संपला आणि मागे राहिल्या असंख्य प्रश्नांनी भरलेल्या वेदना… हा सर्व प्रकार खारघरमधील उत्सव चौक ते सेंट्रलपार्कच्या रस्त्यावर सोमवारी सायंकाळच्या सूमारास घडलेल्या अपघाताचे कथन या अपघातामध्ये मृत तरूण वकिलासोबत दुचाकीवर मागे बसलेल्या जखमी सहकारी वकिलाने पोलिसांच्या जबाबावेळी सांगीतला.
खारघर येथील भीषण अपघातात २८ वर्षीय वकील महेश लोहार यांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातावेळी महेश लोहार यांच्या दुचाकीवर मागे बसलेले सहकारी वकील हे या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असून, त्यांनी दिलेल्या जबाबामुळे या दुर्घटनेचे भरधाव वेगाचे भयावह चित्र उघड झाले आहे.
साक्षीदार वकिलांच्या म्हणण्यानुसार, डंपरने दुचाकीला धडक दिल्यानंतर त्यांनी चालकाला वारंवार ओरडून “थांबा… थांबा…” असे सांगितले. महेश चाकाखाली सापडणार असल्याची स्पष्ट जाणीव करून देऊनही चालकाने दगडाने भरलेल्या ओव्हरलोड दहा चाकी डंपरचे चाक महेश यांच्या अंगावरून पुढे नेले. या निष्काळजी आणि अमानवी कृतीने पोलिसही स्तब्ध झाले आहेत. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला.
या घटनेनंतर आरोपी चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला आणि डंपर मालकाला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या (ठाकरे गट) नगरसेविका लीना गरड यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांनी खारघरवासीयांसह रास्तारोको आंदोलनात सहभाग घेतला.
महेश लोहार हे मूळचे कराड येथील असले तरी त्यांचे शिक्षण आणि संगोपन खारघरमध्येच झाले. गोखले विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले महेश सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेत असत. स्वराज्य युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि खारघर कॉलनी फोरमचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी परिसरातील अनेक समस्या सोडविण्यासाठी त्यांनी काम केले होते. ते नगरसेविका लीना गरड यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात.
बेलापूर आणि पनवेल न्यायालयात वकिली करत असलेले महेश यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि वहिणी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी खारघर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खारघर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, निष्काळजी वाहनचालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
