प्रवासाची मुभा देण्याची समाजमाध्यमांवर मागणी

नवी मुंबई : करोनासह इतर आजारांचे रुग्ण मुंबई, ठाणे यासह नवी मुंबईतील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या भेटीसाठी किंवा त्यांच्याबरोबर राहण्यासाठी जावे लागत आहे. मात्र त्यांना अद्याप लोकल प्रवासास परवानगी नसल्याने परवड होत आहे. बसने प्रवस करायचा तर खूप वेळ जात आहे तर रिक्षा किंवा टॅक्सीचालकांकडून लूट होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याची मागणी होत आहे.

दुसरी लसमात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या सामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र इतरांना प्रवास करता येत नसल्याने नाराजी वाढत आहे. त्यात रुग्णांचे  नातेवाईक आपली परवड मांडत आहेत.

ठाणे व नवी मुंबईतून मुंबईतील रुग्णालयांत जाण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. एकतर घरातील सदस्य रुग्णालयांत असल्याने त्यांच्या उपचारांसाठी पैशांची विवंचना असताना प्रवासासाठीही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. बसने प्रवास करायचा तर अर्धा किंवा एका तासाच्या अंतरासाठी दोन ते तीन तास घालवावे लागत आहेत. त्यात बसला गर्दी असल्याने प्रतीक्षा करावी लागत आहे. रिक्षा, टॅक्सीचा प्रवासही परवडत नसल्याची खंत नातेवाईक व्यक्त करीत आहेत.

कर्करोगावर मुंबईत उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले की, दिवसभर काम केल्यावर रात्री मी रुग्णालयात जाते. दिवसभर आई रुग्णालयात असते. उपचारांसाठी प्रचंड पैसा खर्च होत आहे. त्यात खारघर ते गाडगेबुवा चौक मुंबई असा प्रवास टॅक्सीने दोघींना दररोज दोन वेळा करावा लागत आहे. बसमध्ये गेलो तर किमान चार ते पाच तास लागतात. त्यामुळे लोकल हाच उत्तम पर्याय आहे. रुग्ण उपचाराधीन आहेत त्यांच्या नातेवाईकांना तरी लोकल प्रवासात सूट दिली पाहिजे. हा निर्णय शासनाचा आहे. त्यामुळे आम्ही याबाबत निर्णय घेऊ शकत नाही, असे रेल्वेचे अधिकारी सांगत आहेत.

रुग्णाचे ट्वीट सुरज आठवले यांना

शस्त्रक्रियेसाठी एका रुग्णालयात दाखल केले असून त्यांची आई देखभाल करीत आहे. मात्र तिला प्रवास करताना मोठी अडचण होत आहे. त्यामुळे सरकारने निदान रुग्णाच्या नातेवाईकांना तरी लोकलमध्ये परवानगी द्यावी अशी मागणी आठवले यांनी रेल्वे मंत्री पियुष गोएल व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ट्वीटद्वारे केली आहे.

अत्यावश्यक सेवेतील अनेकांनी अद्याप पहिली मात्राही घेतली नाही, त्यांना रेल्वे प्रवास करता येत आहे. मग रुग्णांच्या नातेवाईकांना का नाही? यासाठी नियामवली करा पण रेल्वे प्रवासाची परवानगी द्या.

प्रदीप जगताप, केईएममध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नातेवाईक