नवी मुंबई : मंदिरातील दानपेटी चोरीचा तपास करत असताना चोरटा पळून जाताना त्याच्या चिखलात उमटलेल्या पाउल खुणाचा अभ्यास करून पोलिसांनी चोरट्याला शोधून काढले. विशेष म्हणजे पाउलखुणातून आरोपी उजव्या पायाने लंगडा असल्याचा समोर आले.आणि एक अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला. गुरूनाथ तुकाराम वाघमारे, (वय ५४, राहणार मुक्काम  खैरासवाडी, पोस्त जिते, तालुका पेण,  जिल्हा रायगड). असे यातील आरोपीचे नाव आहे. १ तारखेला सदर आरोपीने आपटा फाटा येथील  श्री स्वामी समर्थ मंदिराची दानपेटी चोरी केली होती. तसेच तसेच मंदीराच्या बाजूला राहणारे मंदीराचे विश्वस्त अंजली मिलिंद मुणगेकर, यांच्या घराचे मागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करुन कपाटाचे लॉकर मध्ये ठेवलेले देवीचे वापरातील अडीच लाख रुपये किमतीचे  ५ तोळे सोन्याचे दागिने घरफोडी चोरी केली होती. या बाबत पनवेल तालुका पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाची संवेदनशीलता लक्षात घेवून तात्काळ सदर गुन्हा लवकरात लवकर उकल करण्यासाठी याचा तपास समांतर गुन्हे शाखाही करीत होती. सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहिजे आरोपी हा चेहऱ्याला काळा कपडा बांधून अंगावर फक्त हाफ पॅन्ट व दानपेटी घेवून जाताना दिसत होता. गुन्ह्याची कार्यपद्धत, घटनास्थळ, वेळ व इतर परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले असता मंदीराच्या मागील भागात चिखलात मिळालेल्या पाउलखुणा, पाउलखुणांची दिशा मिळून आल्या. आरोपी हा नदीकिनारी असलेल्या चिखलातून गेल्यामुळे आरोपीच्या डाव्या पायाच्या ठळक पाउलखुणा दिसत होत्या व उजव्या पायाचे पाउलखुणा स्पष्ट दिसत नव्हत्या. यावरून आरोपी हा एका पायाने लंगडत चालणारा असावा असा अंदाज पोलिसांनी केला.

हेही वाचा : एपीएमसीतील कृषी माल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा कागदावरच

तसेच  मुख्य रस्त्यावरील सीसीटीवी फुटेजमध्ये आरोपी दिसत नसल्याने तो नदी पार करून पलीकडील पेण तालुक्यातील आदीवासी पाडयांच्या दिशेने गेला असावा असा निष्कर्ष काढला. यावरून खबर्यांना माहिती देण्यात आली.  पेण तालुक्यातील आदीवासी पाडे तसेच इतर परीसरात अशा वर्णनाचा व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमाचा शोध घेतला असता खैरासवाडी, येथे अशा वर्णनाचा एक इसम रहात असल्याची माहीती मिळाली. परंतु तो सध्या पेण पोलीस ठाणेच्या गुन्हयात अटक असल्याचे समजले. सदरबाबत पेण पोलीस ठाण्यातील गुन्हेगारी अभिलेख तपासता सदर इसम हा दोन दिवसापूर्वी कारागृहातून सुटल्याची माहीती मिळाली व तो एका पायाने लंगडत चालत असल्याचे पेण पोलीसांकडून कळाले यावरून सदर गुन्हा त्यानेच केला असल्याची खात्री झाल्याने त्याचे रहाते घराचे परीसरात सापळा लावून त्याला ताब्यात घेतले व त्याची पोलिसी पद्धतीने चौकशी केली असता आरोपीने गुन्हा कबूल केला.

हेही वाचा : नवी मुंबई : सिटीस्कॅन सुविधेमुळे सर्वसामान्य रुग्णांना मिळतोय दिलासा

रवींद्र दौंडकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) आस्थेचा विषय असल्याने स्वतः उपायुक्त शिवराज पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आरोपी हा सराईत असून गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. हि घरफोडी करण्यापूर्वी केवळ दोन दिवस अगोदर तो घरफोडी गुन्हातून जामिनावर सुटला होता. आरोपी कडून घरफोडी प्रकरणात  दानपेटीतील ५ हजाराची रोकड आणि अडीच लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.