नवी मुंबई : शहरात्र प्रचाराचा धडाका सुरू आहे. बेलापूर व ऐरोली मतदारसंघात सर्वच राजकीय पक्ष व युती आघाडी व अपक्षांनी प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे. २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून संध्याकाळच्या प्रचारयात्रांना व सभांना वेग येत आहे. मात्र प्रचारानंतर शहरातील उद्याने व विशेषत: मैदाने ‘श्रमपरिहारा’ची ठिकाणे बनली आहेत. त्यामुळे या प्रचारानंतरच्या श्रमपरिहारावर नियंत्रण कोणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संपूर्ण राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. सर्वच उमेदवार आपली राजकीय ताकद पणाला लावत असून दररोज विविध भागात प्रचार रॅली काढली जात आहे. आपल्या मतदारसंघात विविध विभागात प्रचार झाल्यानंतर कार्यकर्ते प्रचाराची सांगता झाल्यानंतर त्या त्या विभागातील खेळाची मैदाने व उद्याने यांचा ‘श्रमपरिहारा’साठी वापर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रात पालिकेची एकूण ७८ मैदाने असून त्यात २८ शाळेची मैदाने तसेच शहरातील विविध विभागात त्या त्या विभागातील मुलांना खेळण्यासाठी अशी ५० मैदाने आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण व राजीव गांधी या मैदानावर पालिकेची सुरक्षा व्यवस्था आहे. तर इतर मैदानाव सुरक्षा व्यवस्था नसून खेळण्यासाठीची मैदाने असून संध्याकाळी मात्र ही मैदाने प्रचारानंतर श्रमपरिहाराची ठिकाणे बनली असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा…नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!

नवी मुंबई शहरात बेलापूर ते ऐरोली या ८ विभागात ही मैदाने असून त्या ठिकाणी अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेअभावी मैदानातच प्रचारानंतरचा श्रमपरिहार उरकला जात आहे. त्यामुळे सायंकाळी १० नंतर पालिकेच्या या खेळाच्या मैदानांना वेगळे स्वरुप आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मैदानांमध्ये टोळक्या टोळक्याने बसून मनसोक्तपणे पार्ट्या रंगत असून याकडे नवी मुंबई पोलिसांचे तसेच नवी मुंबई महापालिकेचेही दुर्लक्ष होत आहे. शहरात असलेल्या या खेळाची मैदाने कुलूपबंद नसतात त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्यासाठी प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मनसोक्त श्रमपरिहार सुरू असल्याचे पाहायला मिळत असून त्यातच कोण जिंकणार व कोणाला किती मते मिळणार व आमच्याच पक्षाचा आमदार होणार या राजकीय चर्चांचा फड रंगत आहे.

नवी मुंबई शहरातील विविध उद्याने तसेच मैदानांमध्ये जर चुकीचे प्रकार होत असतील तर याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन पेट्रोलिंगच्या माध्यमातून अशा सार्वजिनक जागांच्या ठिकाणी गस्त वाढवून योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. नवी मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या उद्याने व मैदानांबाबत योग्य खबरदारी घेण्यात येईल. – पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १

हेही वाचा…भरधाव ट्रकच्या धडकेत टोलवसुली कर्मचारी ठार 

अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेचा गैरफायदा

नवी मुंबई शहरातील अनेक खेळाची मैदाने ही राजकीय प्रचारानंतर तरुणाई तसेच प्रचार रॅलीत सहभागी झालेल्यांनी फुलून जात आहेत. त्या ठिकाणी श्रमपरिहाराच्या पार्ट्या रंगत असून मैदानांमध्ये अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेचा फायदा घेत पार्ट्या रंगत आहेत. त्यामुळे याबाबतही पालिकेने योग्य खबरदारी घेतली पाहीजे. त्यामुळे पालिकेच्या मैदानांमध्ये ंरंगत असलेल्या पार्ट्यांमुळे काही अनुचित प्रकार झाल्यास कोणाला जबाबदार धरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील यशवंतरव चव्हाण व राजीव गांधी मैदाना व्यतिरिक्त सर्वच मैदानांवर विभाग अधिकाऱ्यांचे नियंत्रण असून त्यांनाही याबाबत खबरदारी घेण्याबाबत सूचना करण्यात येतील . – अभिलाषा म्हात्रे, उपायुक्त क्रीडा विभाग

Story img Loader