श्रीगणेशाचे रविवारी विसर्जन झाले, मात्र गणपतीच्या स्वागतासाठी हौशा-गवशा-नवशांनी केलेली फलकबाजी अद्याप कायम आहे. शहर विद्रुप करणाऱ्या या फलकांना हटविण्यासाठी पालिकेकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.
गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांपासून ते मोठय़ा नेत्यापर्यंत सर्वानीच आपापले सचित्र फलक झळकावून सवंग प्रसिद्धीची हौस भागवून घेतली. शहरात कोठेही अशी फलकबाजी झाल्यास थेट आयुक्तांना जबाबदार धरावे, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला असतानाही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या फलकांकडे काणाडोळाच केला. एवढेच नव्हे तर मुख्य रस्ते खोदून उभारण्यात आलेल्या जाहिरातींच्या कमानींकडेही या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यातील अनेक फलक वाहतुकीसही अडथळा ठरत होते.
पालिकेच्या महासभांमध्ये अनधिकृत फलकबाजीच्या विषयावर चर्चा झाली. जाहिरात कराच्या माध्यमातून पालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र या प्रस्तावास नगरसेवकांनीच केराची टोपली दाखवली. मुंबई उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी शहरामधील २४ तासांत फलक हटविण्याचे आदेश दिले, त्यावेळी पालिकेने हालचाल करून त्यांचा निपटारा केला होता, यानंतर शहरात नियमानुसार फलक लागतील अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. गणेशोत्सवात मोक्याच्या जागी, झाडांवर, नाक्यांवर, चौकामध्ये, विद्युत खांबांवर अनधिकृत फलक लावून शिकवणी क्लास, बांधकाम व्यावसायिक, मोटार कंपन्या, राजकीय नेत्यांनी प्रसिद्धीची हौस भागवून घेतली.
वाशी सेक्टर १७, ऐरोली सेक्टर ९, सेक्टर ३, घणसोली गाव अंतर्गत रोड, कोपरखरणे तीन टाकी येथील परिसर, वाशी सेक्टर ९, सानपाडा, नेरुळ, बेलापूर येथील अंतर्गत मार्गावर कमानी उभारल्या होत्या, तर ऐरोली, दिघा, कोपरखरणे, घणसोली, तुर्भे, वाशी, नेरुळ, बेलापूर आदी सर्वच विभागांमध्ये अनधिकृत फलकबाजी करण्यात आली. याबाबत बोलताना नवी मुंबई महागनरपालिकेचे अतिक्रमण विभाग उपआयुक्त दत्तात्रय नांगरे शहरातील अनधिकृत फलकांवर त्वरित कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.