उरण : मंगळवारी पहाटे पडलेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे उरणच्या हवा गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. पावसाच्या सरींमुळे तसेच येथील विविध उद्योगाकडून हवा गुणवत्ता निर्देशांक कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचाही परिणाम झाला आहे. त्यामुळे गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा झाली असून गुरुवारी हा निर्देशांक ७० ते १०० दरम्यान नोंदविला गेला. त्यामुळे वातावरण दोन दिवस आल्हाददायक बनले होते.
हवेतील वाढते धूलिकण आणि तापमानामुळे उरणच्या हवा गुणवत्ता निर्देशांकात सतत वाढ होत होती. ही मात्रा ८० ते १५० पेक्षा अधिक नोंदविली होती. मात्र सरीमुळे हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा झाली आहे.

उरणच्या वाढत्या हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा येथील नागरिकांच्या शरीरावर हानिकारक परिणाम होऊ लागला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून उरण यामध्ये २०० पेक्षा वर हवेचा निर्देशांक नोंदविण्यात येत होता. ही हवेची प्रदूषित मात्रा मानवी शरीसाठी अतिशय हानीकारक आहे. बदलत्या वातावरणात वाढते तापमान आणि आर्द्रतेतही वाढ झाली आहे. हवेतील वाढते धुळीचे प्रमाण याचा परिणाम येथील नागरिकांच्या शरीरावर परिणाम होत आहे. गेल्या काही वर्षांपासून उरण हे देशातील हवेतील धूलिकणाच्या कक्षेतील शहरांत नोंदविण्यात आला आहे. अनेकदा अतिशय धोकादायक असलेल्या हवेचा निर्देशांक पार पोहोचला होता. ही आकडेवारी हवेतील प्रदूषणाची उच्च पातळी व मानवी शरीरास धोकादायक मानली जात आहे. हवेतील या वाढत्या प्रदूषणामुळे उरणमधील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तर जागतिक आरोग्य संस्थेने दक्षता घेत येथील नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करण्याची सूचना करण्यात येत आहे. यामुळे पर्यावरणवाद्यांनी त्या वेळी चिंता व्यक्त केली होती.

हवेची गुणवत्ता पात्रता :

हवेतील प्रदूषणाची मात्रा ही ० ते ५० चांगली, ५० ते १०० मध्यम, १०० ते १५० आजारी व श्वसन विकारासाठी हानीकारक तर १५० ते २०० ची मात्रा ही आरोग्यास प्रचंड हानीकारक मानली जाते. या मात्रेनुसार उरणच्या हवेतील प्रदूषणाची मात्रा ही माणसासाठी प्रचंड हानीकारक बनली आहे. या हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे उरणमधील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना मुखपट्टी (मास्क) लावण्याची सूचना करण्यात येत आहेत. पावसामुळे हवेतील धूलिकणाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे हवेच्या प्रदूषणात घट झाली आहे. परिणामी हवा गुणवत्ता निर्देशांक पर्यावरणीय बनला आहे.