नवी मुंबई : एअर इंडिया आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ऑनलाइन ड्यूटी-फ्री खरेदीची सुविधा सुरू केली आहे. एअर इंडियाच्या संकेतस्थळ आणि मोबाइल अॅपमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी ड्यूटी-फ्री वस्तू पाहता, त्यांची प्री-ऑर्डर करता आणि ऑनलाइन पैसे भरता येणार आहेत. नवी मुंबईसह मुंबई, अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, मंगळुरू आणि तिरुवनंतपुरम या विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या पात्र प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तू प्रवाशांना संबंधित विमानतळावरील नियुक्त ड्यूटी-फ्री काउंटरवरून घेता येतील. सुरुवातीच्या टप्प्यात ड्यूटी-फ्री वस्तूंवर किरकोळ विक्री किमतीच्या तुलनेत २५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय बँक ऑफर आणि हंगामी सवलतींचाही लाभ मिळणार आहे.  मद्यासह सौंदर्यप्रसाधने, सुगंधी द्रव्ये, चॉकलेट व कन्फेक्शनरी, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध वस्तूंचा ऑनलाइन कॅटलॉग उपलब्ध करण्यात आला आहे.

या सुविधेत एअर इंडियाच्या ‘महाराजा क्लब’ सदस्यांसाठीही विशेष लाभ देण्यात आला आहे. पात्र ड्यूटी-फ्री व्यवहारांवर खर्च केलेल्या प्रत्येक १०० रुपयांमागे तीन महाराजा पॉइंट्स मिळणार आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणांचा समावेश असलेल्या पात्र कोडशेअर प्रवासांनाही ही सुविधा लागू करण्यात आली आहे. आगामी टप्प्यांत आणखी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवर ही सुविधा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे कंपनीने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

ऑनलाइन खरेदी, प्री-ऑर्डर, विमानतळावरून वस्तूंचा ताबा आणि महाराजा क्लब पॉइंट्स अशा सुविधा एकाच प्रक्रियेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच ड्यूटी-फ्री खरेदी करता येणार आहे. एअर इंडिया आणि अदानी विमानतळांच्या संयुक्त उपक्रमातून ही डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली आहे. सध्या ही सुविधा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही उपलब्ध असल्याचेही एअर इंडिया कंपनीने नोंदवले आहे.