नवी मुंबई : ऐरोली सेक्टर-५ येथे उभारण्यात येत असलेल्या बहुप्रतीक्षित नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून याचा शुभारंभ लवकरच होणार आहे. राज्याचे वनमंत्री तथा आमदार गणेश नाईक यांनी शुक्रवारी या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. शहराच्या वाढत्या सांस्कृतिक गरजा लक्षात घेता हे नाट्यगृह नवी मुंबईच्या सांस्कृतिक पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह हे गेली अनेक वर्षे नवी मुंबईतील प्रमुख सांस्कृतिक केंद्र राहिले आहे. मात्र शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची वाढती संख्या लक्षात घेता ऐरोली परिसरात स्वतंत्र नाट्यगृहाची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला. २०१४ मध्ये भूमिपूजन झाल्यानंतर कंत्राटदार बदल, निविदा प्रक्रिया आणि आराखड्यातील सुधारणांमुळे प्रकल्प अनेक वर्षे रखडला. त्यानंतर नव्या कंत्राटदारामार्फत कामाला गती देण्यात आली असून आता नाट्यगृह पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आले आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच महिन्यात नाट्यगृहाचा शुभारंभ होईल असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
पाहणीदरम्यान महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, स्थायी समिती सभापती अशोक पाटील तसेच लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नाट्यगृहातील प्रेक्षागृह, रंगमंच, ध्वनी व्यवस्था, प्रकाशयोजना, कलाकारांसाठीच्या सुविधा आणि इतर कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
नाट्यगृह केवळ वास्तू म्हणून नव्हे, तर व्यावसायिक नाट्यप्रयोगांसाठी सक्षम सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्यावर नाईक यांनी भर दिला. त्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्याशी चर्चा करून नाट्यगृहाच्या तांत्रिक बाबींची पुन्हा पडताळणी करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रशांत दामले यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये ऐरोली नाट्यगृहाची पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले होते. त्यावेळी त्यांनी ध्वनी संयोजन (ॲकॉस्टिक्स), प्रकाशयोजना, आसन व्यवस्था, कलाकारांसाठीचे रंगभूषा कक्ष तसेच प्रेक्षकांसाठीच्या सुविधांबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. ऐरोलीतील हे नाट्यगृह वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या तोडीचे व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. उद्घाटनापूर्वी या सूचनांचा विचार करून आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले.
ठिकाण : सेक्टर ५, ऐरोली, नवी मुंबई (भूखंड क्र. ३७)
क्षमता : ८६० प्रेक्षक आसनव्यवस्था (मुख्य हॉल आणि बाल्कनी स्तर)
रचना : तळमजला अधिक चार मजली आधुनिक इमारत आणि पार्किंग सुविधा.
