नवी मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मागणीसाठी नवी मुंबई शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या समर्थनार्थ ऐरोली मतदार संघात बंद पाळण्यात आला आहे. ऐरोली, रबाळे दिघा परिसर कडकडीत बंद असून अन्यत्र संमिश्र प्रतिसाद आहे. बंद साठी कुठलेही आवाहन करण्यात आले नसून व्यापारी नागरिकांनीच उत्स्फूर्तपणे बंद केला असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. दरम्यान काल रात्रीपासून चौगुले यांची तब्येत बिघडली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. नवी मुंबईतील एमआयडीसी भागात असणाऱ्या झोपडपट्टीचे पुनर्वसन मागणी मान्य होऊन बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरु करण्यात आले होते. मात्र ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी त्यात खोडा टाकून काम बंद केले. या विरोधात महायुती घटक पक्षातील एक असलेले शिवसेना (शिंदे गट) नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी बेमुदत उपोषण एक ऑगस्ट पासून सुरु केले आहे. काल रात्रीपासून त्यांना अस्वस्थ वाटत असून डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली आहे. आज सकाळीही त्यांची तपासणी केली असून अद्याप त्यांना आराम पडलेला नाही. अशी माहिती चौगुले यांच्या स्वीय सहाय्यक यांनी दिली. हेही वाचा.नवी मुंबई : शिरवणेतील अतिधोकादायक इमारत रिकामी, ६१ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले चौगुले यांच्या समर्थनार्थ ऐरोली मतदार संघात बंद पाळण्यात आला आहे. हा बंद पाळण्याचे कुठलेही आवाहन करण्यात आले असून व्यापाऱ्यांनी चौगुले यांना उत्स्फुर्तपणे समर्थन म्हणून बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे ऐरोली दिघा, परिसरात कडकडीत बंद असून कोपरखैरणे आणि घणसोलीतील बहुतांश दुकाने बंद होती. मात्र वैद्यकीय सेवा देणारे औषधांची दुकाने आणि दवाखाने मात्र यातून वगळण्यात आले आहेत.