नवी मुंबई : ऐरोली सेक्टर १५ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ३ एप्रिलपासून ‘जागर २०२६’ या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती समाज, संस्कृती, पर्यावरण आणि साहित्य या विषयांवर विचारमंथन करणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या या स्मारकातील आधुनिक सुविधा आणि बाबासाहेबांच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडविणारे संग्रहालय यामुळे हे स्मारक देशातील उल्लेखनीय ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. आभासी चित्रप्रणालीद्वारे बाबासाहेबांचे भाषण अनुभवण्याची सुविधा, ध्यान केंद्र तसेच समृद्ध ‘ई-लायब्ररी’ असलेले ग्रंथालय यामुळे येथे ज्ञानकेंद्र उभे राहिले आहे.

‘ज्ञान हीच शक्ती’ या विचाराचा प्रसार करण्यासाठी महापालिकेकडून येथे सातत्याने व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मागील साडेचार वर्षांपासून ‘विचारवेध’ या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात आले असून, त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.याच परंपरेत ‘जागर २०२६’ व्याख्यानमालेची सुरुवात ३ एप्रिल रोजी ॲड. वर्षा देशपांडे यांच्या ‘सामाजिक परिवर्तनातील महिलांची भूमिका’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे.

५ एप्रिल रोजी गायिका रसिका आणि कृतिका बोरकर यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. ६ एप्रिल रोजी लोकशाहीर संभाजी भगत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सांस्कृतिक दृष्टी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.८ एप्रिल रोजी ज्येष्ठ संपादक श्रीकांत बोजेवार बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उलगडणार असून, १० एप्रिल रोजी अभिनेते-कवी किशोर कदम (सौमित्र) प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. ११ एप्रिल रोजी अभिनेते सयाजी शिंदे ‘निसर्गाची नवलाई-सह्याद्री देवराई’ या विषयातून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करतील.

तर १३ एप्रिल रोजी युवा पिढीतील पाच प्रतिनिधी ‘भिमा तुझ्या जन्मामुळे…’ या विषयावर संवाद साधणार आहेत.ही सर्व व्याख्याने सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आली असून प्रवेश विनामूल्य आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या वैचारिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.