नवी मुंबई : विमानतळ नामकरणासाठी २४ जूनला सिडको भवनला घेराव

प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे यासाठी प्रकल्पग्रस्त पुन्हा आग्रही झाले आहेत.

नवी मुंबई : विमानतळ नामकरणासाठी २४ जूनला सिडको भवनला घेराव
प्रातिनिधीक छायाचित्र

विमानतळ नामकरण सर्व पक्षीय समितीची पत्रकार परिषदेत मागणी
प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे यासाठी प्रकल्पग्रस्त पुन्हा आग्रही झाले आहेत. दि.बा. पाटील यांच्या ९ व्या स्मृतिदिनी २४ जून रोजी प्रकल्पग्रस्त सिडकोला घेराव घालणार असल्याची माहिती विमानतळ नामकरण सर्व पक्षीय समितीने पत्रकार परिषदेत दिली.

गेली दोन वर्षे नामकरणाचा हा वाद सुरू आहे. या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीनुसार सिडकोने मंजूर करून शासनाकडे पाठविला आहे. तेव्हापासून हा वाद सुरू झाला आहे. गेल्या वर्षी प्रकल्पग्रस्तांनी याच दिवशी मोठे आंदोलन केले होते.

त्यानंतर करोना काळात हा लढा काहीसा शिथिल झाल्याचे बोलले जात असतानाच आता पुन्हा हा आग्रह वाढला आहे. लवणकार (आगरी) समाजातील निवडक प्रतिनिधींचे एक संमेलन नुकतेच दिल्लीतील राजा राममोहन मेमोरियल सभागृहात झाले. या संमेलनात दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा ठराव संमत करण्यात आला असून या नामकरणासाठी पावसाळ्यानंतर दिल्लीतही आंदोलन उभारण्याचा इशारा या वेळी या समाजाने दिला आहे.

येत्या २४ जून रोजी सिडकोला घेराव घालण्यात येणार आहे, अशी माहिती कृती समिती समन्वयक मनोहर पाटील यांनी दिली. तर महिला आणि तरुणांचा या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास समन्वयक दशरथ भगत यांनी या वेळी व्यक्त केला. दि.बा पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिलाच, शिवाय अनेक कामे केलेली आहेत. त्यामुळे सरकाने जनमताचा आदर करीत ही मागणी पूर्ण करून त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी अपेक्षा माजी खासदार संजीव नाईक यांनी या वेळी व्यक्त केली.

२८ एप्रिल २०२१ सिडकोने पारित केलेला प्रस्ताव विखंडित करून स्व. दि. बा. पाटील यांचे नामकरण होऊ शकते. मात्र सिडको आडमुठी भूमिका घेत असल्याने सिडकोवर हा घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याचे समन्वयक डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले.या वेळी मुख्य कृती समितीचे माजी खासदार संजीव नाईक, काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष संतोष केणे, मुख्य समन्वयक दशरथ भगत, डॉ. राजेश पाटील, शैलेश घाग आदी समिती सदस्य उपस्थित होते.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
उरणात रिमझिम पाऊस ; जेएनपीटी बंदरासह परिसरातील रस्त्यांवर पावसाचे पाणी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी