नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेत काम करणाऱ्या स्थापत्य विभागातील अभियंता पदावरील अधिकाऱ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि त्या पदांसाठीची अर्हता हा कायम चर्चेचा विषय आहे. याबाबत अलर्ट इंडिया सामाजिक संस्थेने माहिती अधिकार मार्फत मिळवली. या माहितीतून अनेक धक्कादायक बाब समोर आल्या आहेत. यात प्रामुख्याने मार्च २०२३ रोजीच्या अंतिम सेवा ज्येष्ठता सूचीनुसार शहर अभियंता, अतिरिक्त शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता पदांवरील कार्यरत उमेदवारांकडे विहित शैक्षणिक अर्हता नसल्याचा दावा संबंधित सामाजिक संस्थेने केला आहे. याबाबत बुधवारी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांना निवेदन देत ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेचा कणा समजला जाणाऱ्या स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत प्रश्नचिन्ह उमटत आहे. सध्या पालिका प्रशासनाच्या विविध प्रकारच्या कामांच्या दर्जाबाबत विविध माध्यमातून प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने फोरमच्या रामचंद्र तुपे यांनी माहिती अधिकारच्या माध्यमातून माहिती मिळवली. या माहितीनुसार किमान शैक्षणिक अर्हता निकषांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केले असल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा…खारघर-तुर्भे १० मिनिटांत! लिंक रोड भुयारी मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात

नवी मुंबई महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण ) नियम २०२१ नुसार शहर अभियंता पदावर महापालिकेच्या आस्थापनेवरील अतिरिक्त शहर अभियंता स्थापत्य या पदावर किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या व मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी धारण करणाऱ्या अधिकाऱ्याची सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल असे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र गेल्या ३ वर्षांपासून बीई (सिव्हील ) ही शैक्षणिक अर्हता असणाऱ्या अधिकाऱ्याची शहर अभियंता या पदावर नियुक्ती केली आहे.

पालिका आस्थापनातील शहर अभियंता या पदाप्रमाणेच अतिरिक्त शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य /विद्युत /यांत्रिकी ) पदांवरील नियुक्त अधिकारी हे पदवी (BE/ B-TECH) या किमान शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करीत नाहीत.

कार्यकारी अभियंता स्थापत्य या प्रवर्गातील १३ पैकी केवळ ४ उमेदवार हे अभियांत्रिकी पदवी (बॅचलर इन इंजिनियरिंग) असून अन्य उमेदवार हे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग)धारक आहेत. कार्यकारी अभियंता (विद्युत) पदावरील दोन्ही अधिकारी हे डिप्लोमाधारक आहेत.

हेही वाचा…अटल सेतूवर एनएमएमटीची धाव; बसने मुंबई गाठता येणार, तिकीटदर अद्याप अनिश्चित

उपअभियंता स्थापत्य पदावरील आठ अधिकारी हे पदवीपात्र तर अन्य २० पदविकापात्र शिक्षण घेतलेले आहेत. कनिष्ठ अभियंता विद्युत या पदावरील दोन अधिकारी हे पदवीचे शिक्षण घेतलेले असून अन्य ६ पदविका पात्र आहेत. शाखा अभियंता यांत्रिकी विभागात कोणीही अधिकारी पदवी पात्र नाही. तर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदावरील आठ अभियंत्यांपैकी तीन जण बीई मेकॅनिकल आहेत. कनिष्ठ अभियंता विद्युत प्रवर्गातील ८ पैकी २ अभियंत्यांची शैक्षणिक पात्रता पदवीची आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदावरील ५० अभियंत्यांपैकी केवळ १० अभियंते हे पदवीचे शिक्षण घेतलेले असून अन्य पदविकापात्र आहेत. शाखा अभियंता स्थापत्य पदावरील २१ अभियंत्यांपैकी एकाही अभियंत्याकडे पदवीची अर्हता नाही.

पदोन्नतीने अधिकारी उपलब्ध न झाल्यास पदोन्नतीने अधिकारी उपलब्ध होईपर्यंत राज्य शासनाच्या अधीक्षक अभियंता या पदावरील अधिकाऱ्यांमधून प्रचलित धोरणानुसार प्रतिनियुक्तीने नियुक्ती करता येईल. या नियमाच्या अनुषंगाने आयुक्तांनी तातडीने सरकारकडे शहर अभियंता या पदावर सुयोग्य पात्रता असणाऱ्या अभियंत्यांची नियुक्ती करण्यासाठी मागणी पत्र पाठवावे, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा…१७०० कोटी रुपयांचे देशातील सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र कळंबोलीत – उद्योगमंत्री उदय सामंत

● राज्य सरकारने पालिकेतील अधिकारी-अभियंत्यांच्या किमान शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रतेचे तटस्थ यंत्रणेमार्फत ऑडिट करावे.

● राज्यातील सर्व पालिकांसाठी संवर्ग १ व संवर्ग २ वर्गाच्या नियुक्त्या या एमपीएसीकडून केंद्रीय पद्धतीने कराव्यात. अधिकारी, अभियंते योग्य पात्रतेचे असतील तरच कामाचा दर्जा राखला जाऊ शकतो.

● पालिकेतील अभियंते, अधिकाऱ्यांच्या सरंजामशाहीला चाप बसवण्यासाठी व एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे कार्यरत असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी-कंत्राटदार यांच्याशी प्रस्थापित होणाऱ्या ह्यअर्थपूर्ण ह्य संबंधाला चाप बसवण्यासाठी राज्यातील सर्व पालिका एकत्र आणून दर ५ वर्षांनी त्यांच्या एका पालिकेतून दुसऱ्या पालिकेत बदल्या करण्याचा नियम करावा.

हेही वाचा…करंजा-रेवस खाडीपुलाच्या बांधकामाची निविदा जाहीर, चार वर्षांनंतर उरणच्या विस्ताराचा महामार्ग मार्गी लागणार

शहरांचे शिल्पकार असणारे इंजिनियर्स, कर्मचारी-अधिकाऱ्यांची शैक्षणिक पात्रता योग्य दर्जाची हवीच. पालिकेत एकूण १४० पदे असून त्यापैकी केवळ २७ जण पदवीधारक असून अन्य सर्व ११३ जण पदविका धारक आहेत. शहर अभियंता संजय देसाईसुद्धा पदविकाधारक आहेत. वास्तविक शहर अभियंता ते उपअभियंता पदासाठी पदवीधारक असणे अनिवार्य आहे. – सुधीर दाणी, प्रवर्तक अलर्ट सिटिझन्स फोरम, नवी मुंबई</strong>

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alert citizen forum demands to check educational qualifications of nmmc s engineers psg
First published on: 15-02-2024 at 16:02 IST